kolhapur | पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना आता तीन दिवस फायरिंग प्रशिक्षण 
कोल्हापूर

kolhapur | पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना आता तीन दिवस फायरिंग प्रशिक्षण

पोलिस महासंचालकांचा आदेश; शस्त्र हाताळणीसोबतच होणार सराव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पोलिस अधिकारी आणि कर्मचारी फायरिंगमध्ये अद्ययावत राहावेत तसेच शस्त्राबाबत भीती कमी होण्यासाठी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना तीन दिवस गोळीबाराचे प्रशिक्षण सुरू केले आहे. राज्यभर याची अंमलबजावणी सुरू केली असून, जिल्ह्यातील 40 अधिकारी आणि 200 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना फायरिंगचा (गोळीबार) सराव करणे सक्तीचे आहे. पूर्वी पोलिस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना किमान एक वेळ एक दिवसाची फायरिंग प्रॅक्टिस सक्तीची होती. मात्र, अधिकारी आणि कर्मचारी यांनी फायरिंगमध्ये अद्ययावत राहावे, यासाठी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी हे प्रशिक्षण एक दिवसावरून तीन दिवसांचे केले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस दलातील ड्रिल इन्स्ट्रक्टरचा 10 दिवसांचा पीओटी कोर्स पुण्यात पार पडला असून, हे ड्रील इन्स्ट्रक्टर आता अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत आहेत.

प्रशिक्षणाचे फायदे

कर्मचारी आणी अधिकार्‍यांना सलग तीन दिवस प्रशिक्षण दिल्यामुळे शस्त्र हाताळणीचा आत्मविश्वास वाढतो. टार्गेटवर अचूक निशाणा साधण्यास मदत होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास कशा प्रकारे शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण मिळते. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांना सरावासाठी 9 एमएम पिस्टल तर पोलिस अंमलदारांना एसएलआर बंदूक दिली जाते.

आठवड्यातून दोन बॅच

5 अधिकारी आणि 50 कर्मचार्‍यांचा एक बॅच तयार करून सोमवार ते बुधवार आणि गुरुवार ते शनिवार सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण चालते. यामध्ये पहिल्या दिवशी शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सायंकाळच्या सत्रात टार्गेटवर 10 राऊंड ओपन फायरिंग करून प्रत्येक कर्मचार्‍याला त्याचे गुण सांगून दुसर्‍या दिवशी 15 राऊंड फायरिंगसाठी दिले जातात. यामध्ये झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करून तिसर्‍या दिवशी पुन्हा 15 राऊंड फायरिंगसाठी देण्यात येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT