कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गवळी गँगमधील गुंड सूजल बाबासो कांबळे (वय 19, रा. वारे वसाहत) याच्या खून प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी पुणे येथून अटक केली. गेले 10 दिवस ते पोलिसांना गुंगारा देत होते. सुमीत कांबळे (वय 19, रा. सुधाकर जोशीनगर), शोएब ऊर्फ कोहिनूर सिकंदर शेख (20, रा. मश्चिद गल्ली, राजेंद्रनगर), अक्षय महादेव सोनार (19, रा. रेणुकानगर, पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांना न्यायालयात हजर केले असता 28 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी खुनातील सात हल्लेखोरांना अटक केली आहे. गवळी गँगचा गुंड सूजल कांबळे याचा माया टोळीतील दहा जणांनी 13 जूनला टिंबर मार्केट येथे खून केला होता. एलसीबीच्या पथकाने त्याच दिवशी रात्री ओंकार पोवार, आदित्य पाटील ऊर्फ जर्मनी, आशिष भाटकर, तेजस ऊर्फ पार्थ कळके, श्रवण नाईक, सादिक जॉन पिटर यांच्यासह सात जणांना अटक केली होती.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक संतोष गळवे, हवालदार परशुराम गुजरी, सागर डोंगरे, प्रशांत घोलप, सतीश बांबरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, गजानन गुरव, संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे यांनी कसून तपास केला. फरारी आरोपी पुण्यातील पिंपरी- चिंचवड परिसरात असल्याची माहिती खबर्याकडून समजली होती. त्यानुसार पथकाने पुणे रेल्वे स्थानकातून त्यांना अटक केली.
फरारी संशयितांना शोधण्यासाठी पोलिस त्यांच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेत होते. कोल्हापुरात ते कोणाला फोन करतात का? मित्रांकडे पैशाची मागणी करतात का, यावर पोलिसांनी लक्ष ठेवले होते. त्यांनी त्यांच्याकडील मोबाईल सुरू केल्यानंतर पोलिसांना लोकेशन मिळाले आणि तातडीने त्यांना अटक केली.