कोल्हापूर : बिबट्याचा तीन तास जीवघेणा थरार सुरू असतानाही शाहूपुरीचे जिगरबाज पोलिस निरीक्षक संतोष डोके, अंमलदार कृष्णा पाटील यांच्यासह 5 पोलिसांनी कर्तव्याला प्राधान्य देत युद्धपातळीवर केलेल्या उपाययोजनांमुळे जमावासह विशेषत: परिसरात राहणार्या नागरिकांचे रक्षण होण्यास मदत झाली. बिबट्याला पकडण्यासाठी अधिकार्यांसह पोलिसांनी केलेल्या प्रयत्नाचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह अपर पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. संबंधितांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.
शहरातील मध्यवर्ती आणि सतत गजबजलेल्या नागाळा पार्क परिसरात बिबट्या आल्याची माहिती शहरासह परिसरात पसरताच सार्याची पाचावर धारण बसली. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली. लोकदाटीवाटीने थांबले होते. बिबट्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी पोलिस कर्मचार्यांना सतर्कतेच्या सूचना देत अंमलदार कृष्णा पाटील यांच्यासह चंद्रशेखर लंबे, सरदार शिंदे, इंद्रजित भोसले, अरूण कारंडे नागाळा पार्कच्या दिशेने रवाना झाले.
बघ्यांची गर्दी पाहून त्यांनी जमावाला सुरक्षितस्थळी जाण्याच्या व स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या. जमावाच्या रक्षणासाठी अधिकार्यांसह पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाच इमारतीमागून आलेल्या बिबट्याने पोलिस अंमलदार कृष्णा पाटील यांच्यावर हल्ला केला. पाटील यांनी धाडसाने बिबट्याचा हल्ला परतवून लावला.
चवताळलेला बिबट्या जमावाच्या दिशेने चाल करून आणखी काही लोकांना भक्ष्य करेल, अशी भीती होती. वन विभागाच्या कर्मचार्यांसह माळी काम करणार्या तुकाराम सिद्धू खोंदल यांच्यावर हल्ला करून त्यांनाही जखमी केल्याने सार्यांचीच चिंता वाढली होती. बिबट्याचा तीन तास हा जीवघेणा थरार सुरू होता. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने कर्तव्याला प्राधान्य देत युद्धपातळीवर केलेल्या उपाययोजनांमुळे बिबट्यापासून नागरिकांचे रक्षण करण्यास मदत झाली.
लवकरच होणार सन्मान
पोलिस पथकांच्या उल्लेखनीय कामगिरीची पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दखल घेतली आहे. विशेष कामगिरीचा गौरव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अॅवॉर्डचा प्रस्तावही त्यांनी मागविला आहे. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धिरजकुमार बच्चू, अप्पासाहेब जाधव यांनीही डोके यांच्यासह पथकातील कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.