कोल्हापूर : येथील प्रसिद्ध कवी सचिन कलस रचित “शब्दस्वर” या नूतन कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा करवीर नगर वाचन मंदिर येथे पार पडला. या सोहळ्याला कोल्हापुरातील साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व दिग्गजांच्या हस्ते 'शब्दस्वर' या कवितासंग्रहाचे विधिवत प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना अध्यक्ष आणि मुख्य पाहुण्यांनी 'शब्दस्वर' या संग्रहातील कवितांच्या विषयांची वैशिष्ट्ये, भावनिक गुंफण आणि भाषिक सौंदर्य अधोरेखित केले. कवी सचिन कलस यांच्या दर्जेदार शब्दसृष्टीचे आणि त्यांच्या साहित्य क्षेत्रातील या नव्या योगदानाचे मान्यवरांनी मनःपूर्वक कौतुक केले. स्वतः कवी सचिन कलस यांनी आपल्या मनोगतातून या पुस्तकाच्या लेखनामागील मूळ प्रेरणा, आंतरिक भावना आणि काव्यप्रवास रसिकांसमोर अत्यंत प्रभावीपणे उलगडला.
कार्यक्रमाचे अत्यंत सूत्रसंचालन प्रा. क्षितिजा ताशी यांनी केले. प्रा. डॉ. ममता कलस यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. मानसिंग टाकळे, प्रा. डॉ. शिवलिंग पिसे, प्रा. रवी निकम, हर्षदा नानिवडेकर, वैशाली कुलकर्णी, डॉ. विश्रब्धा पवार आणि सौ. रोहिणी आणेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.