पंतप्रधान मोदींनी कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’ला दाखवला हिरवा झेंडा  file photo
कोल्हापूर

पंतप्रधान मोदींनी कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’ला दाखवला हिरवा झेंडा

मोहन कारंडे

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी ६ वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यात नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी आणि वाराणसी ते दिल्ली पहिल्या २० डब्यांच्या वंदे भारत रेल्वेचा त्यात समावेश आहे. पीएम मोदींनी आज भूज ते अहमदाबाद पहिल्या वंदे मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवला.

कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा (Kolhapur-Pune Express Trains) आज (दि.16) शुभारंभ झाला. सव्वाचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून ऑनलाईन पद्धतीने तर रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा प्रत्यक्ष उपस्थित राहून कोल्हापूर स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

कोल्हापूर स्थानकावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. काही दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर ‘वंदे भारत’ (Kolhapur-Pune Vande Bharat) सुरू व्हावी, अशी मागणी होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर - पुणे वंदे भारत आठवड्यातून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी तर पुणे-कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. याचा ऑनलाईन शुभारंभ झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. याचवेळी कोल्हापूर स्थानकावरही रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांनी झेंडा दाखवला. यावेळी खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कोयना एक्स्प्रेसची वेळ बदलणार

कोल्हापूर-पुणे वंदे भारत सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी सुटणार आहे. याचवेळी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसही सुटते. या दोन्ही गाड्यांची सुटण्याची वेळ आता एकच होणार आहे. यामुळे कोयना एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ दहा ते पंधरा मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. कोयना एक्स्प्रेसची वेळ वाढवली तरी मिरजेपासून पुढील वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, प्रवासाचा कालावधी तोच राहील, या द़ृष्टीने कोल्हापूर-मिरज मार्गावर गाडीचा वेग किंचित वाढवला जाण्याची शक्यता आहे.

द़ृष्टिक्षेपात वंदे भारत... किती आहे प्रवासी क्षमता?

सात चेअर कार व एक एक्झिक्युटिव्ह क्लास असे आठ डबे. 5 डब्यांत प्रत्येकी 78, इंजिनलगत दोन्ही बाजूंच्या डब्यात प्रत्येकी 44, तर एक्झिक्युटिव्ह क्लास- 52 प्रवासी अशी एकूण 530 प्रवासी क्षमता.

कोणत्या दिवशी धावणार?

आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावणार आहे. कोल्हापूर-पुणे (गाडी क्रमांक-20673)- दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार, पुणे-कोल्हापूर (गाडी क्रमांक-20674)- दर बुधवार, शुक्रवार, रविवार.

असे आहे वेळापत्रक

गाडी कोल्हापुरातून सकाळी 8.15 ला सुटून पुण्यात दुपारी 1.30 वाजता पोहचेल. पुण्यातून दुपारी 2.15 ला सुटून कोल्हापुरात सायं. 7.40 वाजता पोहोचेल. जाताना 5 तास 20 मिनिटे, तर येताना 5 तास 25 मिनिटांचा वेळ लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT