भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार-बँक खाते लिंकिंगमधील त्रुटी, लँड सीडिंग (जमीन नोंद) अपूर्ण असणे, लाभार्थी मयत असणे तसेच एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघांकडूनही योजनेचा लाभ घेतला जाणे, अशा विविध कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल एक लाख ३४ हजार ९१८ शेतकऱ्यांचा पीएम किसान सन्मान निधीचा लाभ बंद झाला आहे. ऐन दुष्काळात ‘तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळून वर्षाला १२ हजार रुपये मिळतात. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ३ हजार २८ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. काही वर्षे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभही मिळाला. मात्र, ई-केवायसी न करणे यासह विविध कारणांमुळे यापैकी एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा लाभ सध्या बंद झाला आहे.
तालुका, जिल्हा पातळीवर लाभ सुरू करण्याची सुविधा नाही...
पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. तालुका आणि जिल्हा पातळीवर बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ऑनलाईन ॲक्सेस उपलब्ध नाही. यामुळे सर्व तक्रारदार शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येत आहे.
तालुकानिहाय पीएम किसान लाभ बंद शेतकरी संख्या अशी
आजरा ९,२२२
भुदरगड ७,९७१
चंदगड १०,१४६
गडहिंग्लज ९,८४४
गगनबावडा १,३००
हातकणंगले १६,०६६
कागल १०,२१२
करवीर १७,०७६
पन्हाळा १४,२८८
राधानगरी १७,१८०
शाहूवाडी १०,०४७
शिरोळ ११,५६६
एकूण १,३४,९१८