विशाळगड : केंद्रसरकारकडून ओबीसी गटासाठी ज्यांचे नाव दारिद्र्यरेषेत आहे किंवा ज्यांची कच्ची घरे आहेत, अशा लोकांसाठी काही अटीशर्थींसह पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana) राबवली जात आहे. शाहूवाडी तालुक्यात या योजनेचा विशेष ग्रामसभांद्वारे जोरदार प्रचार करण्यात आला; परंतु आता घरे बांधून पूर्ण होत आली तरी लाभार्थ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करत घराचे बांधकाम केले असून लाभार्थ्यांना घरकुल अनुदानाची प्रतीक्षा आहे.
तालुक्याचे मोदी आवास घरकुल योजनेचे १३१ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. मंजुर लाभार्थ्यांनी आपली कच्ची घरे पाडून उसनवारी करून शासनाच्या निकषाप्रमाणे घरकुलाचे काम सुरू केले. अनुदान तीन टप्प्यात मिळणार होते. पहिला टप्पा घराचा चौथरा झाल्यावर, दुसरा घर सात फुटावर आल्यावर आणि अंतिम तिसरा टप्पा घरकूल पूर्ण झाल्यावर मिळणार होता. काहींचे चौथरे पूर्ण झाले तर काहींची घरे पूर्णत्वाकडे आहेत. १३१ लाभार्थ्यांना पहिल्या हप्ता मिळाला. ७३ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता तर १०५ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम प्राप्त झालेली नाही. तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना सुमारे एक कोटी १ लाख ५ हजार रुपये अनुदानाची प्रतीक्षा आहे.
घरकुल योजनेतून घर बांधकामासाठी साहित्य आणि मजुरी असे १ लाख ४६ हजार ७३० रुपयांचे अनुदान आहे. घराच्या बांधकासाठी लाभार्थ्यांनी उसनवारही केली. अनेकांचे घराचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी अनुदान मिळालेले नाही. अनुदानाअभावी काही घराचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. घरकुल योजनेच्या अनुदानाची रक्कम शासनाकडून तात्काळ उपलब्ध व्हावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
अनुदानासाठी लाभार्थी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत. सध्यातरी शासनाकडून कोणतेही अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांचा दुसरा व तिसरा हप्ता रखडला आहे. अनुदान प्राप्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अनुदान प्राप्त होताच विना विलंब लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल.
- मंगेश कुचेवार, गटविकास अधिकारी, पं.स. शाहूवाडी