कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीसाठी विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. मुदतवाढ मिळण्याबाबतचा अर्ज त्यांनी गुरुवारी (दि. ३०) सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. मात्र, अद्याप सुनावणीची तारीख मिळाली नसल्याने सहकार विभागासह राजकीय वर्तुळाचे लक्ष सुनावणीकडे असणार आहे.
‘गोकुळ’ निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत ३ ऑगस्ट रोजी संपत आहे. अद्याप प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध न झाल्याने पुंगाव येथील स्वामी समर्थ दूध संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने शासनाला निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश देत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनीही दिरंगाई होऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील, असे विभागीय उपनिबंधक यांना पत्राद्वारे सुनावले. त्यामुळे विभागीय उपनिबंधक मिसाळ यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंत निवडणूक प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. मुदतवाढीसंदर्भातील न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
प्रारूप मतदारयादी प्रसिद्धीची प्रतीक्षाच
कोल्हापूर सर्किट बेंच, सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त यांनी ‘गोकुळ’ची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करा, निवडणूक प्रक्रिया सुरू करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे विभागीय उपनिबंधक तातडीने यादी प्रसिद्ध करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शुक्रवारी यादी प्रसिद्ध झाली नाही. शनिवार-रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.