कोल्हापूर : जोतिबा डोंगर येथील कार्यक्रमात ‘दख्खन केदारण्य’ निर्मितीसाठी गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाडे लावण्यास प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित आ. डॉ. विनय कोरे, आ. अशोकराव माने, खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आदी. Pudhari File Photo
कोल्हापूर

कार्बनमुक्त देशासाठी ‘दख्खन केदारण्य’ महत्त्वपूर्ण ठरणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जोतिबा डोंगरावर दहा हजार झाडे लावण्यास प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कार्बनमुक्त देशासाठी ‘दख्खन केदारण्य’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केला. जोतिबा डोंगरावर साकारणार्‍या ‘दख्खन केदारण्य’ उपक्रमात राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत. जोतिबा डोंगरावर तोरणाई कडा येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम झाला.

गडकरी म्हणाले, समाज जीवन सुरळीत चालण्यासाठी आर्थिक नीतिमत्ता, तंत्रज्ञान आणि पर्यावरण या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2070 सालापर्यंत भारत देश कार्बन न्यूट्रल (कार्बन मुक्त) देश करण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी पर्यावरणपूरक कार्य महत्त्वाचे आहे. ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

आ. डॉ. विनय कोरे म्हणाले, अनेक वर्षांपासूनचे जोतिबा विकास आराखड्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. या ठिकाणी सर्व वनखात्याच्या जमिनीवर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यातून चार हजार वर्षांपूर्वीचे वनवैभव पुन्हा याच ठिकाणी उभारले जाणार आहे. मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी ग्रामस्थांशिवाय केली जाणार नाही. प्राधिकरणातही ग्रामस्थांचा सहभाग असेल व त्यांचे मत विचारात घेतले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकल्पास शुभेच्छा देत, याच पद्धतीने जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. खा. धैर्यशील माने यांनी मंत्री गडकरी यांचे विविध विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकास आराखडा शास्त्रीय द़ृष्टिकोनातून, पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येईल, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी आराखडा निर्मिती प्रक्रिया व त्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी आ. अशोकराव माने यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयेन एस., पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कदम, प्रांताधिकारी समीर शिंगटे व वाडी रत्नागिरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

ऑक्सिजन बर्ड पार्क उभारण्याची सूचना

मंत्री गडकरी यांनी विविध उदाहरणांमधून पर्यावरणविषयक महत्त्व पटवून दिले. जोतिबा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीदरम्यान या परिसरात ऑक्सिजन बर्ड पार्क उभारण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT