हुपरी : सोने-चांदीचे दागिने खासगी कुरियर कंपन्यांच्या तुलनेत माफक दरात पोस्ट पार्सल सेवा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याची तयारी केंद्रीय पोस्ट खात्याने दर्शवली असल्याची माहिती केंद्रीय पोस्ट खात्याचे वाहतूक व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिषेक सरकार यांनी दिली.
हुपरी चांदी हस्तकला फाऊंडेशनने केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे याप्रश्नी एक महिन्यापूर्वी कोल्हापूर येथील कार्यक्रमात मागणी केली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी मागणीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता होण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सोने-चांदी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या या निर्णयाने तब्बल 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा हुपरी येथून देशभर पोस्टाने चांदीचे दागिने पाठवले जाणार आहेत. अशी सेवा पोस्टाने चालू केल्यास संपूर्ण देशातील सोने, चांदी, हिरे आदी मौल्यवान वस्तू पार्सलने पाठवणार्या उद्योजकांना फायदा होणार आहे. पोस्टाचे पार्सल दर खासगी कुरियर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. पण सोने, चांदी या मौल्यवान धातूच्या पार्सल चोरीच्या धोक्यापासून वाचण्यासाठी उद्योजक विमा संरक्षण घेतात. पोस्टाचे विम्याचे दर खासगी कंपन्यांच्या तुलनेत दहा पटीपेक्षा जास्त आहेत. विम्याचे दर खासगी कंपन्यांच्या तुलनेत कमी करण्याची तयारीही पोस्टाने दाखवली आहे.
दागिने पाठवण्यासाठी पोस्टापेक्षा खासगी व्यवस्था स्वस्त
40 वर्षांपूर्वी दळणवळणाची इतकी सोय नव्हती. त्यावेळी हुपरीतून चांदीचे दागिने संपूर्ण देशभर पोस्टाने पाठवले जात होते. कच्ची चांदी पोस्ट पार्सलनेच येत होती. परंतु वाटेतच पार्सल फोडून त्यातील चांदी, दागिने काढून घेऊन दगड, विटा घातलेली पार्सल येऊ लागल्याने पोस्टाने दागिने पाठवणे बंद झाले होते. तेव्हापासून खासगी पद्धतीने चांदी व मालाची ने-आण सुरू आहे. सध्या पोस्टाचा पार्सल दर सर्वात कमी आहे. परंतु चोरीच्या जोखमीसाठी विमा संरक्षण पाहिजे असल्यास 1 लाखाला जीएसटीसह 1770 रुपये मोजावे लागत आहेत. याउलट खासगी कुरियर कंपन्या एक किलो चांदी किंवा दागिने केवळ 250 ते 300 रुपयांत ने-आण करतात.
हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशनने केलेल्या मागणीनंतर केंद्रीय दळणवळण मंत्रालयातून आवश्यक सूत्रे हलली. पोस्टाचे दिल्ली येथील वाहतूक व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिषेक सरदार यांनी आपल्याशी संपर्क साधला. मंत्री सिंदिया यांच्याकडे केलेल्या मागणीबाबत विस्तृत माहिती घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात खासगी कुरियर सेवेच्या तुलनेत माफक दरात पोस्ट पार्सल सेवेचा पथदर्शी प्रकल्प सुरू करू. हा प्रयोग यशस्वी झाला तर ही सेवा संपूर्ण देशभर सुरू करू असे सांगितले. या निर्णयाने तब्बल 40 वर्षांनंतर परत एकदा हुपरी येथून देशभर पोस्टाने चांदीचे दागिने पाठवले जाणार आहेत. त्याचा उद्योजकांना निश्चितपणे फायदा होणार आहे.मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदी हस्तकला फाऊंडेशन