कोल्हापूर : पेठवडगाव परिसरात गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या मदतीने अशांतता निर्माण करत असलेल्या ‘पैलवान गँग’च्या म्होरक्यासह दहाजणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. याबाबतचा आदेश जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी पारित केला. या गँगवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, शासकीय कामात अडथळा, गर्दी, अपहरण, जुगार, दारू, फसवणूक असे 27 गुन्हे दाखल आहेत.
‘पैलवान गँग’चा म्होरक्या प्रवीण बाबू माने (वय 30) याच्यासह अजिंक्य ऊर्फ अक्षय अशोक माने (37), विशाल विनायक माने (29), विश्वजित अशोक माने (22), दीपक वसंत माने (41), धनाजी शंकर माने (33), अजित वसंत माने (37), सागरे राजेंद्र स्रोत (21), अमर ऊर्फ राहित सुरेश वडर (25), सूरज नेताजी जाधव (33, सर्व रा. पेठवडगाव) यांना हद्दपार करण्यात आले आहे.
या गँगने निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वडगाव पोलिस ठाण्याच्या वतीने हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून शाहूवाडीच्या उपविभागीय पोलिस अधिकार्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी चौकशी अहवाल सादर केला होता. या अहवालात या टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरिकांची जीवित व मालमत्तेची सुरक्षा, असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन हद्दपार प्राधिकारी तथा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी 10 जणांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपार करत असल्याचे आदेश पारित केले. पोलिस निरीक्षक, वडगाव पोलिस ठाणे यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत, त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून घालवून दिले आहे.