एकनाथ नाईक
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) कोल्हापूर येथे तब्बल 35 कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक पेट स्कॅन (झएढ-उढ) उपकरण येत्या दोन ते तीन महिन्यांत दाखल होणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (झझझ) तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येणार असून, शासनाने निश्चित केलेल्या माफक दरात कर्करोग रुग्णांची तपासणी होणार आहे.
सीपीआरच्या ‘कुंभी’ इमारतीत हे उपकरण बसविण्यात येणार आहे. यामुळे कोल्हापूरसह कोकण, सीमाभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी दिलासा मिळणार आहे. सध्या मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांतच ही सुविधा उपलब्ध आहे. आता ती कोल्हापुरातही उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही. खासगी डायग्नोस्टिक सेंटमध्ये पेट स्कॅन तपासणीसाठी सुमारे 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. मात्र, सीपीआरमध्ये शासन दरपत्रकानुसार कमी दरात तपासणी होणार असल्याने आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
सीपीआरमध्ये गेल्या वर्षापासून कर्करोग (कॅन्सर) ओपीडी सुरू असून, दररोज सुमारे 40 ते 50 रुग्ण उपचारासाठी येतात. येथे रक्ताचा कर्करोग तज्ञ, सर्जन यांच्यासह चार तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवेत कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर पेट स्कॅन सुविधा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून ही सुविधा सीपीआरमध्ये सुरू होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दाखल होणारे पेटे स्कॅन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून खासगी रुग्णालयांतील यंत्रणांपेक्षाही अधिक सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सुविधेमुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून कर्करोग लढाईविरूध्द हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
सीपीआरमध्ये येत्या दोन ते तीन महिन्यांत पेट स्कॅन उपकरण दाखल होणार आहे. ते तब्बल 35 कोटींचे असून, ‘पीपीपी’ तत्त्वावर ही सुविधा येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आजाराचे त्वरित निदान होऊन उपचार करणे शक्य होणार आहे. पेट स्कॅनसाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.- डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, सीपीआर
‘पेट स्कॅन’ म्हणजे काय?
पेट स्कॅन (positron Emission Tomography)) ही कर्करोग निदानासाठी अत्याधुनिक इमेजिंग तपासणी पद्धत आहे. शरीरात रेडिओअॅक्टिव्ह ट्रेसर दिल्यानंतर कर्करोग पेशींची वाढ, प्रसार आणि उपचारांचा परिणाम याचे अचूक निदान होते व कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे, हे कळते. कॅन्सरचा प्रसार (स्टेजिंग) निश्चित होतो, उपचारांनंतरची प्रगती समजते.
जिल्ह्यात 300 कोटींची औषधे
राज्यात दिवसेंदिवस कर्करोगग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्तनाच्या कर्करोगासह गर्भाशयाचे मुख, तोंड, अन्ननलिका व इतर कर्करोगांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जिल्ह्यात कर्करोग उपचारांसाठी दरमहा 200 ते 300 कोटी रुपयांची औषधे लागतात, अशी भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे सीपीआरमध्ये पेट स्कॅन सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर ही मागणी पूर्णत्वास येत असल्याने रुग्णांसह कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.