सोलापुरातील उड्डाणपुलासाठी 966 कोटी मंजूर  Pudhari File photo
कोल्हापूर

kolhapur Flyover Project | पादचारी उड्डाण पूल लटकणार

अतिरिक्त ८३ लाखांचा प्रश्न; त्यात महारेलचा ‘ओव्हरब्रीज’चा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

अनिल देशमुख

कोल्हापूर : रेल्वे फाटकावर ये-जा करण्यासाठी उभारण्यात येणारा पादचारी उड्डाण पूल पुन्हा लटकणार आहे. भूमिपूजन होऊन तब्बल अडीच वर्षे उलटण्यानंतरही काम सुरू न झालेल्या या पुलासाठी पुन्हा अतिरिक्त ८३ लाख रुपयांची रेल्वेने मागणी केली आहे. या रकमेचा प्रश्न असतानाच आता महारेलने याच ठिकाणी ‘ओव्हरब्रीज’ उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे पादचारी उड्डाण पूल आणि लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या मार्गावर पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकावर पादचारी उड्डाण पूल उभारण्यासाठी २०१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव पुलाची मंजुरी रखडली आणि त्याचा उभारणी खर्चही वाढत गेला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी या पुलाला मुहूर्त मिळाला. रेल्वेने ऑगस्ट २०२३ मध्ये पूल उभारणीसाठी अंतिम मंजुरी दिली. यानंतर पुलासाठी ३ कोटी ८८ लाख रुपयांचा जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला.

या पुलासाठीच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने या कामाची वर्क ऑर्डरही कंत्राटदाराला दिली. त्यानंतर तत्कालिन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दि. ९ मार्च २०२४ रोजी या पुलासाठी भूमिपूजन झाले. त्यानंतर रेल्वेने पुन्हा आडकाठी आणली. या ठिकाणी विजेचा खांब येत असून, तो स्थलांतरीत करण्यासाठी अतिरिक्त ८३ लाखांच्या निधीची मागणी केली. यामुळे हा पूल पुन्हा लटकलाच आहे. दरम्यान, महारेलने याच ठिकाणी ओव्हरब्रीज प्रस्ताव दिल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. यामुळे पादचारी पुलाचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या तावडे हॉटेल-शिवाजी पूल या उड्डाण पुलाला दाभोळकर कार्नर ते राजारामपुरी असा उड्डाण पूल जोडण्याची मागणी पुढे आली आहे. त्यानुसार नवे डिझाईन करण्याचाही निर्णय झाला आहे. यामुळे पादचारी उड्डाण पूल लटकण्याचीच चिन्हे अधिक आहेत.

लोकप्रतिनिधी जाब विचारणार का?

रेल्वेने ऑगस्ट २०२३ मध्ये या पुलाला परवानगी दिली. यानंतर विद्युतीकरणाच्या खांबाचे कारण देत अतिरिक्त निधीची मागणी केली; पण जेव्हा परवानगी दिली, त्यापूर्वीच विद्युतीकरण पूर्ण झाले होते. मग, परवानगी देताना रेल्वेचे अधिकारी नेमके काय करत होते? याचा जाब लोकप्रतिनिधींनी तरी रेल्वेला विचारणार आहेत की नाही? अतिरिक्त रक्कम रेल्वेला दिली जाईल; पण तोपर्यंत या पुलाचा वाढत जाणाऱ्या खर्चाचे काय? आणि जिल्हा नियोजन समितीचे हे पैसे अन्य कोणत्या तरी कारणांसाठी वापरता येतील की नाही? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

असा आहे प्रस्तावित पूल

एकूण लांबी : ५१ मीटर एकूण उंची : ६.५ मीटर एकूण रुंदी : ३.६ मीटर

दोन्ही बाजूंच्या एकूण पायऱ्या : ९८ (प्रत्येकी ४९)

५१ मीटर (संपूर्ण पूल) छत (कव्हर शेड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT