विशाळगड : शेंबवणे (ता. शाहूवाडी) येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला पाझर तलाव फुटल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले असून, सुमारे 35 एकर शेती मातीखाली गाडली गेली आहे. जलसंधारण अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या आणि नियोजनशून्य कामाचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मातीचा 3-4 मीटर उंचीचा भराव कोसळल्याने कासारी नदी लाल चिखलाने भरली आहे. ही गेल्या वर्षातील दुसरी घटना असूनही दोषींवर कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये तीव— संताप व्यक्त होत आहे. ‘तलावाला कोणताही धोका नाही,’ असा केविलवाणा बचाव करत अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. तलावाचे घळभरणी काम अपुरं आणि हलक्या दर्जाचं केल्याने आज अखेर मोठा अनर्थ घडला. भराव तुटून तलावातील पाणी थेट नदीपात्रात मातीसकट वाहून गेलं. तलावाखालच्या तीनशे एकरांवर मातीचं थर बसल्याने पिके मातीखाली गाडली गेली आहेत.
या घटनेमुळे शेतकर्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असून, दोषींवर तातडीने कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रकरणाला नैसर्गिक आपत्तीचे लेबल लावून दाबण्याचा प्रयत्न होणार का, अशी भीतीही व्यक्त होत आहे.