Drainage Scams | ड्रेनेज घोटाळ्यानंतर पवडी अकाऊंटस् विभागाचा चेहरामोहरा बदलला ! Pudhari File Photo
कोल्हापूर

Drainage Scams | ड्रेनेज घोटाळ्यानंतर पवडी अकाऊंटस् विभागाचा चेहरामोहरा बदलला !

नवे अधिकारी, कर्मचार्‍यांवर विश्वास; वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्यांची हकालपट्टी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कसबा बावड्यातील ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामात मोठा घोटाळा उघडकीस येताच महापालिकेतील प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या विभागाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचार्‍यांची या विभागातून हकालपट्टी केली आहे. नव्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर प्रशासकांनी विश्वास दाखविला आहे. नवे अधिकारी, कर्मचारी सध्या डोळ्यांत तेल घालून काम करत आहेत. ज्या विषयी माहिती नाही, त्याची दहा जणांकडून सल्ला घेऊन काम करत आहेत.

घोटाळा उघडकीला आल्यानंतर ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात सामील असलेल्या तिघांना निलंबित केले आहे. प्रशासकांच्या या आक्रमक निर्णयामुळे महापालिकेतील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी हादरले आहेत. विशेषतः प.व.डी. अकाऊंटस् विभागात घोटाळ्याची शहानिशा झाल्यानंतर या विभागात कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता आणि मानसिक तणाव पसरलेला दिसत आहे.

प.व.डी. अकाऊंटस् विभागात गेल्या दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. घोटाळ्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर या विभागातील तब्बल दहा कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. एखाद्या विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या होण्याचा ही पहिलीच वेळ असून संपूर्ण विभागाचाच चेहरामोहरा बदलला आहे. पवडी अकाऊंट विभागात आमूलाग्र बदल केला आहे.

अशा स्थितीत विभागातील सर्व कामकाजाची जबाबदारी नवख्या कर्मचार्‍यांवर टाकली असून या विभागात मुरलेल्या जुन्यांची हकालपट्टी केली आहे. या विभागात नवीन नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना या कामाचा अनुभव नाही. प.व.डी. अकाऊंटस् विभागाचा कार्यभार प्रीती घाटोळे यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. महिलांसाठी आणि बालकल्याण विभागातील कामकाज पाहिलेल्या प्रीती घाटोळे यांना प.व.डी. अकाऊंटस् विभागाच्या कामकाजाचा अनुभव नसली, तरी विश्वास दाखवून नेमणुका दिल्या आहेत. त्यांच्यासह इतर नऊ कर्मचार्‍यांनादेखील या विभागात नवीन म्हणून नियुक्त केले गेले आहे.

प्रामाणिक कर्मचार्‍यांची घरफाळा, पवडी विभागाकडे पाठ

नगररचना, प. व. डी. अकाऊंटस् आणि घरफाळा विभाग महापालिकेत महत्त्वाचे आहेत. या विभागांत यापूर्वी घरफाळा घोटाळा उघडकीस आला होता, ज्यामुळे पाच जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर या विभागांतील कर्मचार्‍यांवर नियुक्तीबाबतचे आग्रह कमी झाले. प.व.डी. अकाऊंटस् विभागाची स्थितीही आता तशीच बनली आहे. या विभागात नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांना फाईल हातात घेताच एक भयंकर ताण जाणवत आहे. घोटाळ्यानंतर उघडकीस आलेली परिस्थिती पाहता या विभागात काम करायला प्रामाणिक कर्मचारी तयार नाहीत. ‘खाया ना पिया, ग्लास तोडा बारा आना’ अशी अवस्था व्हायला नको म्हणून प्रामाणिक कर्मचार्‍यांनी या विभागाकडे पाठ फिरविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT