मुरगूड : अल्बानिया देशातील तिराना या ठिकाणी दि. 26 फेब—ुवारी ते 2 मार्च दरम्यान होणार्या सेकंड वर्ल्ड रँकिंग सीरिज आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल, मुरगूडची मल्ल अपेक्षा पाटील हिची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे.
गाजियाबाद (उत्तर प्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेमध्ये अपेक्षाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यावेळी 65 किलो वजन गटांमध्ये प्रेक्षणीय कुस्त्या करत सुवर्णपदकाची कमाई केल्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने अपेक्षाची या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड केली.
अपेक्षाने आतापर्यंत शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक, व हिंदू गर्जना केसरी किताबची मानकरी तसेच वेगवेगळ्या राज्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरली आहे. तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील संधी प्रथमच मिळाली आहे त्यामुळे तिला 2028 मध्ये होणार्या ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेच्या वेगवेगळ्या क्वालिफाय राऊंडसाठी भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यास मिळणार आहे. तसेच भारतीय कुस्ती संघाच्या सराव शिबिरासाठी सुद्धा अपेक्षाची निवड झाली आहे. मंडलिक आखाड्याचे प्रमुख माजी खा. संजय मंडलिक व वीरेंद्र मंडलिक यांनी अपेक्षाची भेट घेऊन तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अपेक्षाला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांच्याकडून कुस्तीचे धडे मिळत आहेत.