kolhapur Municipal Elections | ‘ओपन’साठी फिल्डिंग टाईट, तिकिटासाठीच फर्स्ट फाईट Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur Municipal Elections | ‘ओपन’साठी फिल्डिंग टाईट, तिकिटासाठीच फर्स्ट फाईट

मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : आरक्षण निश्चित झाल्याने खर्‍याअर्थाने महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे; परंतु काही ठिकाणी गेले पाच ते सात वर्षे निवडणुकीची तयारी केलेल्या ओपनमधील (सर्वसाधारण) इच्छुकांच्या आकांक्षावर पाणी फिरले आहे. आवश्यक आरक्षण न पडल्याने आता अनेकांना ओपनचा आधार राहिला आहे. ओपनमधून लढण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या प्रबळ उमेदवारांसह साम, दाम, दंड आदींचा वापर करणार्‍यांचा समावेश आहे. परिणामी, ओपनसाठी आरक्षित झालेल्या प्रभागात आता टफ फाईट होणार आहे; मात्र त्या उमेदवारांना पहिल्यांदा पक्षांच्या तिकिटाची लढाई जिंकावी लागणार आहे.

प्रभाग ठरणार बॅटलग्राऊंड...

आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेक प्रभागातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शेजारच्या प्रभागांत अनुसूचित जाती, ओबीसी, महिला प्रवर्ग असे आरक्षण पडल्याने तिथून ‘ओपन’ म्हणून तयारी करणार्‍या अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरले आहे. निवडणुकीची तयारी केलेले, सामाजिक व राजकीय नेटवर्क उभे करणारे, जनसंपर्क मोहिमा राबवणारे आणि प्रभागातील प्रश्न हाताळणारे अनेक जण ‘ओपन’ आरक्षण न मिळाल्याने थेट शून्यावर आले आहेत. परिणामी, ते आता मोजक्याच ओपन प्रभागात स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे उमेदवारांची गर्दी उसळली आहे. एकाच प्रभागातून चार ते सहा इच्छुक उभे राहणार असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा चुरशीची बनली आहे. काही ठिकाणी तर घराघरांतून उमेदवारीसाठी दबाव सुरू आहे. प्रभागनिहाय राजकीय आकडेवारी पाहता ओपन प्रभागच यावेळी ‘बॅटलग्राऊंड’ (शेवटपर्यंतची लढाई) ठरणार, हे स्पष्ट आहे.

तिकिटासाठी सिद्ध करण्याची धडपड

परंपरेने काही प्रभागांमध्ये पक्ष तिकीट देताना निश्चित नेतृत्वाला प्राधान्य दिले जात होते; मात्र यंदा या प्राथमिक चॅनेलमध्येच मोठा बदल दिसू लागला आहे. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांना आपले बळ सिद्ध करण्यासाठी जोरदार मोहीम राबवावी लागत आहे. स्थानिक पातळीवरील समाजकारण, वॉर्डातील वर्षानुवर्षे केलेले काम, सदस्य नोंदणीतील योगदान, प्रभागातील संघटनांशी असलेली नाळ, प्रभागातील कुटुंबांची प्रत्यक्ष भेट, सोशल मीडियावरील प्रचार या सर्व माध्यमांतून इच्छुक स्वतःला पक्षापुढे योग्य उमेदवार म्हणून सादर करण्याची धडपड करत आहेत.

राजकीय वातावरण तापले

कोल्हापूर महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी शहराकडे विशेष लक्ष वळवले आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सर्वच पक्ष आक्रमक झाले असले, तरी नेतेमंडळींवर उमेदवारांचा तिकिटासाठी दबाव वाढत आहे. अन्यथा बंडखोरीला उधाण येणार, हे निश्चित आहे.

तिकीट कोणाला? चर्चेला उधाण

ओपन प्रभाग कमी असल्याने विविध समाजघटकांतील उमेदवार एकाच वॉर्डमध्ये ओसंडून भरले आहेत. काही ठिकाणी एकाच घरातील दोन जण विविध पक्षांतून तिकीट मिळवण्याच्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे ‘कोणाला तिकीट मिळते?’ हा प्रश्न प्रभागात चर्चेचा विषय झाला आहे. इच्छुकांमध्ये ‘पहिल्यांदा तिकिटाची लढाई जिंकल्यावरच निवडणूक’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT