Kolhapur ZP/ Panchayat Samiti | जि. प., पं. स.चे स्वीकृत सदस्य निकषानुसार  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur ZP/ Panchayat Samiti | जि. प., पं. स.चे स्वीकृत सदस्य निकषानुसार

जिल्हाधिकारी : पक्षनिहाय जागा लवकरच; बुधवारनंतर निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी स्वीकृत सदस्य निकषानुसार निवडले जातील, त्यानुसार प्रत्येक पक्षाने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांनुसार उमेदवार देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गुरुवारी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना केली. कोणत्या पक्षाला स्वीकृतच्या किती जागा मिळणार हे लवकरच स्पष्ट केले जाईल. येत्या बुधवार (दि. २३) नंतर स्वीकृत निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली होती. आता शासनाचे परिपत्रक जारी झाल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेत दहा सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य या प्रमाणात नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० सदस्य असल्याने त्यांच्या वाट्याला दोन स्वीकृत सदस्यपदे येण्याची शक्यता आहे. काँग्रेसलाही दोन सदस्यपदे मिळण्याची शक्यता असून शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी एक सदस्यपद येण्याची शक्यता आहे. स्वीकृत सदस्यपदामुळे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात या पदांसाठी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, पक्षांतर्गत हालचालींनाही वेग येणार आहे. ‘गोकुळ’ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांबाबत बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटनेत्यांना प्रथमच होत असलेल्या स्वीकृत सदस्य निवडीबाबतची प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. पक्षाच्या संख्याबळानुसार स्वीकृतची संख्या कशी निश्चित केली जाते, त्यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतील, याची प्राथमिक माहिती या बैठकीत देण्यात आली.

जि. प.त सहा स्वीकृत सदस्य

जिल्हा परिषदेच्या एकूण जागांनुसार सहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होईल, अशी शक्यता आहे. याबाबत अधिकृतपणे प्रशासनाने स्पष्टता दिली नाही. मात्र, संबंधित गटनेत्यांना त्यांना मिळणाऱ्या संभाव्य जागेनुसार तयारी करण्याची सूचना दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT