कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीचा जीर्ण झालेला बाहेरील स्लॅबचा काही भाग गुरुवारी (दि. २७) दुपारी बाराच्या सुमारास चप्पल लाईन परिसरातील रस्त्यावर अचानक कोसळला. रस्त्यावर गर्दी नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, झालेल्या प्रचंड आवाजाने दुकानदार व नागरिकांत घबराट पसरली. गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीची मागणी करूनही महापालिकेने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर फुटवेअर असोसिएशनने छत्रपती शिवाजी चौक ते गंगावेस रस्ता रोखून धरत तीव्र आंदोलन केले. महापालिका अधिकार्यांना धारेवर धरले.
नेमके काय घडले?
छत्रपती शिवाजी चौकातील ही चार मजली मुख्य इमारत १९८३ साली बांधली असून ४३ वर्षे जुनी आहे. यात महापालिकेची १२ प्रशासकीय कार्यालये आणि १८८ व्यावसायिक गाळे आहेत. गुरुवारी तिसऱ्या मजल्यावरील बाहेरील स्लॅबचा भलामोठा ढपला चप्पल लाईन रस्त्यावरील दोन दुकानांसमोर कोसळला. ढपल्याचे सिमेंटचे तुकडे थेट दुकानांत उडाले. दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेले शिवाजी डोईफोडे, राजेश गाडेकर हे व्यापारी या दुर्घटनेतून बालंबाल बचावले.
घटनास्थळी आक्रमक आंदोलन
वारंवार तक्रार करूनही अधिकारी ढिम्म राहिल्याने फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूपाल शेटे, विजय करजगार, मनोज गवळी, मारुती गवळी आणि महेश रुकडीकर यांच्यासह दुकानदारांनी रस्त्यावर ठाण मांडले. घटनेनंतर उशिरा आलेल्या सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना आंदोलकांनी चांगलेच धारेवर धरले. इमारतीची दुरुस्ती तातडीने न झाल्यास अधिकाऱ्यांना इमारतीत जाऊ देणार नाही आणि त्यांचे टेबल रस्त्यावर मांडू, असा इशारा शेटे यांनी दिला. दरम्यान, महापालिका अधिकार्यांनी तात्पुरते सुरक्षेसाठी नेट लावण्यात येईल, असे सांगितले.