परिते गावात ग्रामस्थांनी मूक निषेध मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | जोतिबा डोंगरावरील घटनेच्या निषेधार्थ परितेत ग्रामस्थांचा मूक निषेध मोर्चा

जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी गेलेल्या परिते (ता. करवीर) येथील भाविकांना काही पुजाऱ्यांकडून मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Parite Protest vs Jotiba Incident

कौलव : जोतिबा डोंगरावरील घटनेच्या निषेधार्थ परिते गावात ग्रामस्थांनी मूक निषेध मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. जोतिबा डोंगरावरील घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी गेलेल्या परिते (ता. करवीर) येथील भाविकांना काही पुजाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानाची सासनकाठी घेऊन गेलेल्या भाविकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले, अशी माहिती आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिते ग्रामस्थांनी गावातून मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. पोलीस प्रशासन आणि देवस्थान व्यवस्थापन समितीने अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले की, काही पुजाऱ्यांनी भाविकांशी विनाकारण वाद घालत शिवीगाळ केली. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनाही अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच काही भाविकांचा पाठलाग करून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली, तर काहींवर नारळाने हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

परिते गावात पारंपरिकरित्या शाकाहारी यात्रा साजरी केली जाते आणि त्या काळात गावात मटण विक्री तसेच हॉटेल्स बंद ठेवली जातात. अशा परिस्थितीत भाविकांवर मद्यपानाचे आरोप करण्यात आले, ते पूर्णपणे खोटे असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पाटील यांनी या घटनेमुळे श्रद्धेला धक्का बसल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT