कोल्हापूर : जोतिबा मंदिरावरील पुजार्‍यांना हटवण्याच्या मागणीसाठी परिते ग्रामस्थांनी सोमवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मूक मोर्चा काढला. (सर्व छाया : पप्पू अत्तार) 
कोल्हापूर

Jyotiba temple assault case | परिते ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

जोतिबा मंदिर येथील मारहाणीचा निषेध : अखंड गाव एकवटले; लहानांसह ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा तथा दख्खनचा राजा (वाडी रत्नागिरी) येथे मौजे परिते (ता. करवीर) येथील भाविकांना अकारण अमानुष मारहाणीचा निषेध म्हणून परिते ग्रामस्थांनी सोमवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मूक मोर्चा काढला. या मूक मोर्चात परिते गावालगत असणार्‍या कुरुकली, बेले, घोटवडे, आवळी, राशिवडेसह अन्य गावांतील ग्रामस्थ मूक मोर्चात सहभागी होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक मोर्चा आल्यानंतर कोल्हापुरातील विविध पक्ष, संघटनांनी पाठिबा दर्शवला.

मारहाणीचा सजीव देखावा

जोतिबा मंदिरात कशा प्रकारे ग्रामस्थांवर मारहाण झाली याचा लहान मुलांचा सजीव देखावाही मूक मोर्चात होता. यामध्ये जोतिबाच्या वेशात केदार पाटील होता. हा देखावा लोकांचे लक्ष वेधून घेत होता.

तोंडाला काळा मास्क, दंडाला काळी फीत

जोतिबा मंदिराच्या ठिकाणी ग्रामस्थांना पुजार्‍यांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून परितेमधील सर्व ग्रामस्थ मूक मोर्चात सहभागी झाले होते. तोंडाला काळा मास्क, दंडाला काळ्या पट्टी बांधून तसेच डोक्यावर पांढरी टोपी घालूनच ग्रामस्थ आले होते. यावेळी महिला, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता.

लक्षवेधी फलक

मूक मोर्चात ग्रामस्थांनी घेतलेले पुढील फलक लक्षवेधी ठरले : यामध्ये भक्तांच्या जीवावर मोठे झालेल्या पुजार्‍यांना शासन झाले पाहिजे, चालणार नाही, चालणार नाही दादागिरी चालणार नाही, गब्बर पुजारी हटवा, जोतिबा मंदिर वाचवा, गुन्हेगारी प्रवृत्तीला शासन झालेच पाहिजे, भक्तांना मारहाण करणार्‍या पुजार्‍यांना अटक झाली पाहिजे...

गाव बंद, भर उन्हात रस्त्यावर

मंदिराच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीमुळे परिते गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सोमवारी गाव बंद ठेवून ग्रामस्थ सकाळी 10 पासूनच कोल्हापुरात दसरा चौकात दाखल होत होते. दुपारी 12 च्या सुमारास मूक मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या मारला. सुमारे चार तास ग्रामस्थ भर उन्हात दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी रस्त्यावर उभे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT