कोल्हापूर : परीख पुलाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात येणार्या पादचारी उड्डाण पुलाचा खेळखंडोबा सुरूच आहे. पूलाची जागा बदलण्याच्या महापालिकेच्या विनंतीला रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे बुधवारीही समोर आले. बुधवारी कोल्हापूर दौर्यावर आलेल्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) राजेश वर्मा यांनी महापालिका आणि रेल्वेचे अभियंता बैठक घेऊन तोडगा काढतील, तांत्रिक अडचण दूर करतील असे सांगितले. यामुळे हा पूल आणखी रखडण्याचीच चिन्हे आहेत.
कोल्हापूर रेल्वे स्थानक आणि रेल्वे गुडस् मार्केट यार्ड येथे वर्मा यांनी बुधवारी सकाळी पाहणी केली. यादरम्यान महापालिकेचे उप शहर अभियंता अरुण गुजर आणि कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी याबाबत विभागीय विद्युत अभियंत्यांशी चर्चा करण्याची सूचना केली. गुजर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. पादचारी उड्डाण पूल उभारण्यात येणार्या जागेत विद्युत तारांचा अडसर असल्याने ही जागा बदलून पुढे घेत असल्याचे गुजर यांनी सांगितले. त्यावर जागा मागे घ्या; पण पुलाचे काम करताना तारा स्थलांतरित कराव्या लागणारच आहेत. त्यासाठी येणार्या खर्चाचे 1 कोटी 13 लाख रुपये रेल्वेकडे भरावे लागतील असे स्पष्ट केले. यानंतर वर्मा यांना विचारता त्यांनी मात्र बैठक होईल, त्यात तोडगा निघेल असे सांगितले.
द़ृष्टिक्षेपात पूल
पुलासाठी मंजूर रक्कम- 1 कोटी 85 लाख
महापालिकेचा हिस्सा- 55 लाख
राज्य शासनाचा हिस्सा-1 कोटी 30 लाख
जिल्हा नियोजनमधून दिला निधी- 1 कोटी 30 लाख
...................................................
पुलासाठी प्रस्ताव सादर- 5 डिसेंबर 2017
प्रशासकीय मान्यता- 31 मार्च 2018
पुलाचे डिझाईन सादर- 15 नोव्हेंबर 2018
डिझाईनला अंतिम मान्यता-2 ऑगस्ट 2023
पूलाचे भूमिपूजन- मार्च 2024
...................................................
पुलाची एकूण लांबी- 51 मीटर
पुलाची एकूण उंची-6.5 मीटर
एकूण रुंदी-3.6 मीटर
दोन्ही बाजूंच्या पायर्या-एकूण 98 (प्रत्येकी 49)
कोल्हापूरला कोणी वाली आहे का?
या पादचारी पुलासाठी निधी उपलब्ध करून देणारे लोकप्रतिनिधीच, पुलाचा आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याचे भूमिपूजन करणारे लोकप्रतिनिधीच, मग इतके वर्षे पूल रखडला आहे, त्याचा जाब हेच लोकप्रतिनिधी का विचारत नाहीत? याबाबत संयुक्त बैठक घेऊन, तत्काळ तोडगा काढण्याइतकी त्यांच्यात धमक नाही का? का कोल्हापूरला कोणी वालीच नाही, असे सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.