कोल्हापूर : युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत उभा असलेला चंदगड तालुक्यातील पारगड किल्ला हे आता राज्य संरक्षित स्मारक झाले आहे. राज्य शासनाने त्याबाबतची घोषणा केली. सोमवारी याबाबतची अंतिम अधिसूचना जाहीर केली. पारगड हे प्राचीन व ऐतिहासिक स्मारक, संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
त्यानुसार 3 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना काढली होती. महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, 1960 (सन 1961 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 12) या अधिनियमाच्या कलम 4 च्या पोट-कलम (1) अन्वये काढलेल्या या अधिसूचनेवर हरकतीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. या कालावधीत कोणत्याही हरकती आल्या नसल्याने राज्य शासनाने पारगड हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
या घोषणेसह राज्य संरक्षक स्मारकाबाबतची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबतचे आदेश सोमवारी राज्य शासनाने दिले. त्यानुसार मौजे मिरवले (ता. चंदगड) येथील गट क्रमांक 21 मधील 19.43 हेक्टर आर. इतक्या क्षेत्रात असलेल्या पारगडचा राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश झाला आहे.
पारगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता इ.स. 1674 साली बांधला. या गडाचा पहिला किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांचे नाव घेतले जाते. इ.स. 1689 मध्ये औरंगजेबाचा पुत्र शहाजादा मुअज्जम व खवासखान यांनी पारगडवर हल्ला केला होता. या युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी धारातीर्थी पडले. विठोजी आणि त्यांच्या सती गेलेल्या धर्मपत्नी तुळसाबाई यांच्या समाधी आजही गडावर आहेत.