कोल्हापूर : वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक भूमिका घेत अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणार्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मोहीम कोल्हापूर शहरात आजपासून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी बुधवारी शहरातील विविध पोलिस ठाण्यांत सात पालकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले.
नव्या कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास देणे ही गंभीर बाब मानली जात असून, दोषी पालकांना तीन वर्षांपर्यंत कारावास आणि 25 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक निलोप्पर यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
त्या अनुषंगाने शहरातील सर्व पोलिस ठाण्यांनी एकत्रित मोहीम राबवत चौकाचौकांत नाकेबंदी केली आहे. वाहन चालविताना आढळलेल्या अल्पवयीन मुलांवर तत्काळ कारवाई करण्यात येत असून, त्यांच्या पालकांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. बुधवारी सहा ते सात अशा गुन्ह्यांची नोंद झाली. ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पालकांनी जबाबदारीने वागून अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालकांनी सावधानता बाळगण्याची गरज
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी पालकांना थेट पोलिस ठाण्यात बोलवून गुन्हे दाखल केल्यामुळे पालकांना पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. अनेक पालक या कायद्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाई होऊन प्रकरण मिटेल, या अपेक्षने पालक वाट पाहत होते. परंतु, वरिष्ठ स्तरावरून थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याने पालकांनी आता सावधानता बाळगण्याची गरज आहे.