Daily 'Pudhari' initiative | ‘मुलगी हवी हो!’ : केवळ कन्यारत्न असणाऱ्या पालकांचा होणार गौरव 
कोल्हापूर

Daily 'Pudhari' initiative | ‘मुलगी हवी हो!’ : केवळ कन्यारत्न असणाऱ्या पालकांचा होणार गौरव

दैनिक ‘पुढारी’चा उपक्रम; गुरुवारी टेंबे सभागृहात रंगणार सोहळा

अरुण पाटील

कोल्हापूर : ‘‘एक लेक जन्माला येते, तेव्हा केवळ एक अपत्य नव्हे, तर एका घराण्याचे भवितव्य आणि संस्कृती जन्माला येते.’’ आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीची नवी शिखरे गाठत असतानाही समाजात मुलगा-मुलगी भेदाची मानसिकता अजूनही वेदना देते.

मात्र, आजची ‘ती’ प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाचा सुवर्णध्वज फडकवत घराचा आणि राष्ट्राचा प्रकाश बनली आहे. ‘‘मुलगी हाच आमचा अभिमान’’ ही भावना रुजवण्यासाठी आणि लिंगभेदाला तिलांजली देऊन मुलींना सक्षम करणाऱ्या पालकांचा गौरव करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’च्या वतीने ‘मुलगी हवी हो!’ या विशेष जनजागृती अभियानाचा प्रारंभ केला जात आहे. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ भाऊसिंगजी रोड आणि व्हिनस कॉर्नर, तर सहप्रायोजक सारस्वत को-ऑप बँक लिमिटेड व भंडारी ग्रुप आहेत. व्ही. जे. पाटील फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. हा केवळ एक सत्कार सोहळा नसून, समाजात मुलींविषयी असलेला भेदभाव मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि स्त्री सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सुरू केलेल्या व्यापक चळवळीची ही नांदी आहे.

ज्या पालकांनी केवळ एक किंवा दोन मुलींचेच स्वागत करून त्यांना शिक्षण, संस्कार व बळ देत कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचवले, अशा आदर्श पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. या सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचे ‘स्त्री सक्षमीकरणाची सद्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील

वार व तारीख : गुरुवार, दि. २७ ऑगस्ट

वेळ : सकाळी १०.३० वाजता

स्थळ : गोविंदराव टेंबे सभागृह जुना देवल क्लब, खासबाग मैदानाजवळ, कोल्हापूर.

SCROLL FOR NEXT