खासगी क्लास 
कोल्हापूर

कोल्हापूर : खासगी क्लास, अ‍ॅकॅडमींचे पेव फुटले

मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नियमांचे सर्रास उल्लंघन : पालकांना सजग राहण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा
व्ही. डी. पाटील

सरवडे : जिल्ह्यासह राज्यात खासगी क्लास आणि अ‍ॅकॅडमींचे पेव फुटले असून कोणीही उठावे आणि हमखास यश देणारे म्हणून क्लासेस उघडावे, अशी परिस्थिती गावागावात सगळीकडे पाहायला मिळत आहे. यासाठीची नियमावली पायदळी तुडवून खासगी क्लासची ‘इंडस्ट्री’ बनली आहे. अलीकडेच विद्यार्थ्यांच्याबाबतीत राधानगरी व करवीर तालुक्यात घडलेल्या घटनांमुळे अशा खासगी क्लासमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांच्या व्यक्तिगत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी क्लासचालकांना वेळीच चाप बसवून कडक नियम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

बालकांच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) नुसार सरकार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनांच्या शाळांना अनुदान दिले जाते. शिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. माध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, प्रवास भत्ता यासह विविध शिष्यवृत्त्याही सरकारकडून देण्यात येतात. याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थी लाखोंच्या संख्येने घेत असताना दुसरीकडे अशा शाळांतील विद्यार्थी संख्या घटत चालल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात सरकारच्या नवनवीन योजनांचा होणारा भडीमार, शिक्षकांना लावण्यात येणारी अशैक्षणिक कामे आणि अशा अनेक कारणांमुळे ही विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यामुळे गुणवत्तेचा दर्जाही घसरत चालला आहे. त्यामुळे साहजिकच पालकांचा ओढा खासगी क्लासकडे वळला आहे.

यामुळे गावापासून ते शहरापर्यंत सर्वत्र अशा खासगी क्लासचे अक्षरशः पेव फुटले आहे. पहिली ते दहावी आणि बारावी ते पदवीधर पर्यंतचे शिक्षण देणार्‍या खासगी क्लासची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन खासगी क्लास सुरू करण्यासाठी क्लासचालकांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही. केवळ मोठमोठ्या जाहिरातींमधून विद्यार्थ्यांचे प्रवेश आपल्याकडे वळवले जातात. पालकवर्गही अशा जाहिरातींना भुलून गुणवत्ता व दर्जा न पाहता स्वस्तातील खासगी क्लासची निवड करतात. अशा क्लासमध्ये मिळणार्‍या मूलभूत सुविधा किंवा आपल्या पाल्याच्या सुरक्षेकडे पालक दुर्लक्ष करतात.

बहुतांश क्लास निवासी स्वरूपाचे...

सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपले पाल्यही मागे राहायला नको म्हणून पालक मुलांना खासगी क्लासमध्ये पाठवतात. ग्रामीण भागात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा आणि एनएमएमएस परीक्षा यांचे मार्गदर्शन करणारे खासगी क्लास जोमात सुरू आहेत. यातील बहुतांश क्लास निवासी स्वरूपाचे आहेत. दिवसरात्र मुले अशा क्लासेसमध्ये राहत असल्याने त्यांच्या पालकांनाही मुलांना भेटता येत नाही. महिना-दोन महिन्यांतून एकदा होणार्‍या पालकभेटीवेळीच मुलांची व त्यांच्या पालकांची भेट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT