कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी संशोधन ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे व खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, संभाजीराजे, मालोजीराजे, डॉ. मंजुश्री पवार, सुरेश शिपूरकर, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.  
कोल्हापूर

पन्हाळगडावर ताराराणींचा पुतळा उभारणार

पालकमंत्री आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रणरागिणी ताराराणी यांनी पन्हाळगडावर करवीर संस्थानची स्थापना करून रयतेच्या स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्या या स्फूर्तिदायी इतिहासाची साक्ष देणारा पुतळा पन्हाळगडावरील ताराराणी यांच्या वाड्यासमोर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार, अशी घोषणा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केली.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित हिंदवी स्वराज्य रक्षिका - करवीर राज्य संस्थापिका ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा शुक्रवारी न्यू पॅलेसच्या प्रांगणात खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मंत्री आबिटकर यांनी ताराराणी यांच्यावर वृत्तमालिका निर्मिती करण्याबरोबरच त्यांच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या रांगणा-भुदरगड किल्ल्यांचे जतन-संवर्धनासाठी विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले; तर मंत्री मुश्रीफ यांनी ताराराणींसह शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा पन्हाळगडावर उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, यासाठी तीन कोटींचा निधी नगरपरिषदेला हस्तांतरित केल्याचे सांगितले.

ताराराणींचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करा ः खा. सुप्रिया सुळे

दिल्लीपती औरंगजेब बादशहाला तब्बल सात वर्षे अखंड लढा देऊन शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याचे रक्षण रणरागिणी ताराराणी यांनी केले. इतकेच नव्हे तर औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीतच गाडले. इतिहासाला कलाटणी देणार्‍या ताराराणी यांचा स्फूर्तिदायी इतिहास शैक्षणिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा. तसेच एआयसारख्या अत्याधुनिक माध्यमातून तो सर्वदूर पोहोचवावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

देश संविधानाने चालतो, कोणाच्या मर्जीने नाही

भारत देश संविधानाच्या आदर्श विचारसरणीने चालतो. कोणाच्या मर्जीने नाही. खरे बोलण्यासाठी विशेष शौर्याची गरज नसते. भारत देश हा लोकशाहीला आदर्श मानणारा देश आहे. यामुळे सत्तेत बसूनच पॉलिसी ठरविता येते ही संकल्पना चुकीची आहे. विरोधी पक्षात बसूनही पॉलिसी करता येते. बीड-परभणी प्रकरणात गप्प बसणे म्हणजे गुन्हेगार ठरतो. परदेशी लोकांना भारताच्या इतिहासाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, इथल्या राजकारण्यांकडून होणार्‍या सोयीच्या इतिहासाची भीती वाटत असल्याचे स्पष्ट मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पॅटर्न देशभर राबवावा

अध्यक्षीय भाषणात खासदार शाहू महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर रयतेच्या स्वराज्याचे रक्षण रणरागिणी ताराराणी यांनी करून दिल्लीपती औरंगजेब बादशहाला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याचा अद्वितीय इतिहास घडविला. महाराष्ट्र पॅटर्न वारसा जपत खासदार शरद पवार यांनी दिल्लीपर्यंत राजकीय कारकीर्द गाजविली. आजच्या घडीला खासदार सुप्रिया सुळे यांनी हा वारसा जपला आहे. यामुळे हा महाराष्ट्र पॅटर्न देशभर राबविणे काळाची गरज आहे.

प्रकाशनानंतर लेखक डॉ. पवार यांनी हा ग्रंथ खासदार शाहू महाराज यांना अर्पण केला. यानंतर खा. शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. पवार व खा. सुळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, माजी खा. संभाजीराजे, माजी आ. मालोजीराजे, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, डॉ. मंजुश्री पवार, सौ. याज्ञसेनी महाराणी, सौ. संयोगिताराजे, सौ. मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशस्वीराजे, यशराजराजे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि करवीर संस्थानचे जहागीरदार, सरदार-सरकार, मानकरी घराण्याचे वंशज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. मंजुश्री पवार यांनी शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने सुरू असणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतिहासविषयक चौफेर कार्याची माहिती देऊन यासाठी खासदार शरद पवार व खासदार शाहू महाराज यांच्याकडून मिळणार्‍या पाठबळाविषयी आवर्जून सांगितले. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी, तर आभार प्रदर्शन प्रबोधिनीचे अध्यक्ष सुरेश शिपूरकर यांनी केले. तब्बल तीन तास सुरू असणार्‍या कार्यक्रमाच्या प्रारंभी ताराराणींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यानंतर शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी ताराराणींच्या पोवाड्याचे तर छत्रपती शाहू विद्यालयातील तारा कमांडो फोर्सच्या कॅडेटस्नी महाराणी ताराराणी गौरवगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

पेशव्यांना विरोध केल्याने ताराराणींना विरोध : डॉ. पवार

आपल्या मनोगतात लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी रणरागिणी ताराराणी ग्रंथाची निर्मिती करून शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आप्पासाहेब यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ताराराणी यांनी पेशव्यांना विरोध केल्याने इतिहासात त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. तसेच नंतरच्या काळात इतिहासकारांकडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वास्तविक ताराराणी मराठ्यांची नाममात्र नव्हे, तर डी फॅक्टो (अस्तित्व दर्शविणारी) छत्रपती होती. पुढच्या काळात सातार्‍याच्या गादीचीही प्रतिष्ठा त्यांनीच राखल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

रिश्ते हमेशा रहते हैं

आपल्या भाषणात खा. सुप्रिया सुळे यांनी टोलेबाजी केली. त्या म्हणाल्या, ‘पे्रमाने मागा. सगळे देऊन टाकू, खाली हाथ आयेंगे... खाली हाथ जाएंगे, चुनाव आते जाते हैं, लेकीन रिश्ते हमेशा रहते हैं...।’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT