पन्हाळा ग्रामीण रुग्णालय 
कोल्हापूर

Panhala Rural Hospital : केवळ कागदावरच सोयींचा थाट, प्रत्यक्षात आरोग्याची बिकट वाट

पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील अवस्था; सुविधांची वाणवा

पुढारी वृत्तसेवा

इंद्रजित शिंदे

पन्हाळा : पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असताना वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे केवळ संबंधित अधिकाऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसून रुग्णालयातील अनेक प्रलंबित आणि गंभीर समस्या देखील ऐरणीवर आल्या आहेत.

दोन एकरांच्या विस्तीर्ण परिसरात उभारलेल्या या रुग्णालयात 30 खाटांची सुविधा असून, दररोज सरासरी 100 हून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. ईसीजी, एक्स-रे, पोस्टमार्टम लॅब तसेच अद्ययावत ऑपरेशन थिएटरसारख्या सुविधा उपलब्ध असूनही प्रत्यक्षात आणीबाणीच्या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपलब्धता ही मोठी अडचण ठरत आहे. रुग्णालयाकडे स्वतःची रुग्णवाहिका असूनही कायमस्वरूपी चालक नसल्याने रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. रुग्णालयातील 27 कर्मचाऱ्यांसाठी 11 निवासस्थाने उभारण्यात आली असली, तरी त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. इमारतींची रंगरंगोटी वर्षानुवर्षे झालेली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी आहे आणि पावसाळ्यात छताला गळती लागते. त्यामुळे निवासी डॉक्टर आणि कर्मचारी येथे राहण्यास टाळाटाळ करतात. याचा थेट परिणाम रात्रीच्या रुग्णसेवेवर होत असल्याचे दिसून येते.

आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह

रुग्णालयाचे दोन्ही मुख्य दरवाजे गंजले असून, परिसरात अस्वच्छता आणि रंगरंगोटीचा अभाव असल्याने रुग्णालयाला भकास स्वरूप आले आहे. निवासस्थानी पाण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना प्रसन्न वाटण्याऐवजी येथील दुरवस्थेमुळे भीती आणि चिंता वाटत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शासकीय आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT