कोल्हापूर : धुके, पाऊस, वारे आणि ऊन असे सातत्याने बदलते वातावरण... सह्याद्रीच्या डोंगररांगेतील चढ-उतारांचा रस्ता... दगड-गोटे, चिखल, काट्या-कुट्यांनी भरलेल्या पायवाटेचा रस्ता अशा खडतर वाटेवरून हजारो आबालवृद्ध शिवभक्त इतिहासप्रेमी पन्हाळगड-मसाई पठारमार्गे पावनखिंडीच्या दिशेने रवाना झाले. निमित्त होतं 365 व्या पावनखिंड स्मृतिदिनाचे.
शिवकाळात 12 व 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ शेकडो मावळ्यांनी बलिदान दिले. या प्रेरणादायी इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी राज्यभरातील शिवभक्त, इतिहासप्रेमी संस्था, संघटनांच्या वतीने दोन दिवसीय पन्हाळगड ते पावनखिंड या साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले होते. शनिवारी पन्हाळगडवरून मोहिमांना प्रारंभ झाला. यात सह्याद्री प्रतिष्ठान ट्रस्ट कोल्हापूर, शिवराष्ट्र परिवार, कै. आनंदराव पोवार युद्धकला प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर हायकर्स, एक ऐतिहासिक भटकंती, स्वराज्यरक्षक शिवबांचा मावळा, राजा शिवछत्रपती परिवार, हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा, सह्याद्री ट्रेकर्स यांचा समावेश होता.
नरवीर शिवा काशीद समाधी नेबापूर, पन्हाळगडावरील शिवा काशीद व बाजीप्रभू आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादनाने मोहिमांचा प्रारंभ झाला. यावेळी खा. धैर्यशील माने, बांदल घराण्याचे वंशज राजेंद्र बांदल, खा. श्रीकांत शिंदे ट्रस्टचे मंगेश चिवटे, पन्हाळा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी संदीप यादव, मनपाचे निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे आरोग्यदूत बंटी सावंत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, सुनील पसारे, शाहीर दिलीप सावंत, विक्रम जरग यांच्यासह संयोजक हेमंत साळोखे, पंडित पोवार, सागर पाटील, प्रशांत साळोखे, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर चित्तथरारक शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके झाली. यानंतर पन्हाळगड उतरून मसाई पठार पार करून मोहीमवीर पावनखिंडीच्या दिशेने रवाना झाले.
विशाळगड : रस्त्यावरून खाली दरीकडे उतरताना दिसणारी दाट झाडी, ओढ्यावरील पूल पार केल्यावर दिसणारे ढाल-तलवार व भगवा झेंडा असलेले वीरांचे स्मारक हे पावनखिंडीचे प्रवेशद्वार आहे. एका टोकालगत कासारीचे उगमस्थान असून, खिंडीत उतरण्यासाठी दोन शिड्या आणि मोठमोठे खडक आहेत. पंधरा फूट रुंद आणि पाचशे मीटर लांबीची ही खिंड घनदाट जंगलांनी आच्छादलेली आहे. भर पावसात पावनखिंड पाहताना तो स्वामिनिष्ठेचा इतिहास अंगावर रोमांच उभे करतो. या पावनभूमीला अभिवादन करण्यासाठी सध्या मोहीम सुरू आहे. अनेक मावळे या ऐतिहासिक मार्गावरून जात आहेत. पन्हाळ्यावरून सुरू झालेली ही मोहीम खिंडीतून मसाई पठारापर्यंत, खडकाळ खिंडीतून दुर्गम वाटेने कुंभारवाडी, खोतवाडी, माळेवाडी असा टप्पा गाठते. पाटेवाडी ते सुकाईमाचीच्या धनगरवाड्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. येथून पुढे तासांतच पांढरेपाणीमार्गे पावनखिंड गाठली जाते.