पन्हाळा : महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथे ८० वर्षीय वृद्धेला कापडी पट्टीने बांधून तिच्या अंगावरील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या जबरी चोरीचा पन्हाळा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावला. या चोरीच्या कटात पीडित वृद्धेचा नातजावईच सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी नातजावयासह दोघांना अटक केली आहे.
महाडिकवाडी येथील रहिवासी व प्राथमिक शिक्षक सरदार बापू महाडिक (वय ५५) यांच्या घरी १२ सप्टेंबर रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील वृद्ध इंदुबाई महाडिक (वय ८०) यांचे हात व तोंड कापडी पट्टीने बांधून त्यांना जखमी केले. त्यांच्या अंगावरील पाच तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पन्हाळा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला वेग दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याबरोबरच पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गावातीलच नंदकिशोर सदानंद महाडिक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडिक (वय २८, दोघेही रा. महाडिकवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. त्यातील एक संशयित हा पीडित इंदुबाई महाडिक यांचा नातजावई असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसी चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी दोघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पन्हाळा पोलिस ठाण्याचे श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश खोत पुढील तपास करीत आहेत.