Jewellery Theft (Pudhari Photo)
कोल्हापूर

Panhala Jewellery Theft : आळवे येथे वृद्धेला मारहाण करून सोन्याचे दागिने लांबवले

अज्ञातावर पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल, आठवड्यात दुसरी घटना

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : आळवे (ता. पन्हाळा) येथील एका घरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करून वृद्धेला मारहाण करत सोन्याची कर्णफुले लांबवल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद संभाजी लाड (वय ३०, रा. आळवे, ता. पन्हाळा) यांनी याबाबत पन्हाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुरुवारी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या लोखंडी दरवाजाची काच फोडून कडी काढली. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने फिर्यादी यांची आजी हिराबाई बापू लाड (वय ८०) यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने जबरदस्तीने वृद्धेच्या कानातील ७० हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले खेचून घेतली. या झटापटीत आजींना दुखापत झाली.

तसेच सदर चोरट्याने साक्षीदार सौरभ पाटील यांच्या घरातही अनधिकृत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरगर करत आहेत.

पन्हाळा तालुक्यात खळबळ

महाडिकवाडीतही ८० वर्षांच्या वृद्धेला बांधून ५ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. ही घटना ताजी असतानाच आळवे येथे वृद्धेला दुखापत करून ७० हजारांचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. या दुहेरी चोरीच्या सत्रामुळे पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर गुन्हेगारांना रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पन्हाळा पोलीस व एलसीबीने महाडिकवाडी प्रकरणाचा २४ तासांत छडा लावत नातजावयासह दोघांना अटक केली असली, तरी परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT