कोल्हापूर : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेल्या तालुक्यांत मंगळवार (दि. २९) पासून पंचनामे करा, त्याचा अहवाल दहा दिवसांत सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सोमवारी संबंधित तहसीलदारांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठक झाली. यावेळी डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात जिल्ह्यातील पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड या सहा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांत खरीपचे सुमारे ८० ते ९० हजार हेक्टर क्षेत्र आहे, त्याचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका, अशा सूचना डॉ. राठोड यांनी दिला.
जिल्ह्यात सध्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरेल इतका चारा आहे. मात्र, त्यापुढे चाऱ्याची टंचाई जाणवू शकते. त्यानुसार जूनपर्यंतच्या चाऱ्याचे नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या. याकरिता जिल्हा नियोजन तसेच ‘सीएसआर’मधूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे उपस्थित होते.