पंचगंगा नदी 
कोल्हापूर

पंचगंगेचे पाणी थेट पिण्यायोग्य नाही!

राज्य सरकारच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा
आशिष शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मगरमिठीत पूर्णपणे अडकलेली आहे. पंचगंगेत दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी व 21 नाल्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे पाण्याचा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) 10 ते 20 मिलिग्राम प्रति लिटर या श्रेणीत आहे. हे पाणी कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला पिण्यायोग्य नाही. जर थेट हे पाणी पिले तर जठर विकार, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड, त्वचा व डोळ्याचा संसर्ग होऊ शकतो. ही सारी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामी पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आली आहे.

पंचगंगा नदीचा कोल्हापूर ते शिरोळ पट्टा भारत सरकारच्या जलगुणवत्ता सर्वेक्षणात प्राधान्य क्रमांक 3 च्या प्रदूषित पट्ट्यात येतो. जेव्हा एखाद्या नदीच्या विशिष्ट भागात (पट्ट्यात) पाण्याचे जैविक ऑक्सिजनची गरज (बीओडी) हे 3 मिलिग्राम प्रति लिटर पेक्षा जास्त असते, तेव्हा त्या पाण्याला प्रदूषित नदीपट्टा म्हणून घोषित केले जाते. यामध्ये बीओडी 6 ते 10 म्हणजे मध्यम प्रदूषित (चौथी श्रेणी), 10 ते 20 मध्यम ते गंभीर प्रदूषित (तिसरी श्रेणी).

‘या’ नाल्यांसाठी एसटीपी प्रस्तावित

राजहंस नाला (कोल्हापूर) लहान एसटीपी बसवण्याची गरज, बापट कॅम्प नाला (कोल्हापूर) - लहान एसटीपी प्रस्तावित, शिव मंदिर लक्षतीर्थ वसाहत (कोल्हापूर) छोटा एसटीपी आवश्यक. वळिवडे नाला (करवीर) लहान एसटीपी शक्य, शिरोळ नाला (शिरोळ) लहान एसटीपी किंवा फायटोरिड शक्य.

अ‍ॅक्शन प्लॅन तयार

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यामध्ये विविध उपाययोजना सुचवल्या आहेत.

‘हे’ आहेत थेट पंचगंगेत जाणारे नाले

कसबा बावडा नाला, दुधाळी नाला, जयंती नाला, सीपीआर हॉस्पिटल नाला, राजहंस नाला, रमणमळा नाला, सिद्धार्थ नगर नाला, बापट कॅम्प नाला, लाईन बाजार नाला, गोळीबार मैदान नाला, शिव मंदिर, जमदार क्लब नाला, कळा ओढा (इचलकरंजी), चांदूर नाला (इचलकरंजी), गांधीनगर नाला (करवीर), वळिवडे नाला, रुई नाला, कबनूर नाला, हुपरी नाला, शिरढोण नाला, शिरोळ नाला.

शुद्धीकरणासाठी ‘या’ पद्धतींचा होणार वापर

  • फायटोरिड : वनस्पतींच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण.

  • रेनेयू : नाला ईकॉलॉजिकल रेस्टोरेशन यंत्रणा - नाल्यातील सांडपाण्यावर थेट प्रक्रिया.

  • विकेंद्रित एसटीपी : लहान, स्थानिक स्तरावर उपचार करणारे संयंत्र.

अ‍ॅक्शन प्लॅनमध्ये सुचवलेत ‘हे’ उपाय

  • 21 ठिकाणी सांडपाणी उपचार प्रकल्प, विकेंद्रित एसटीपी, फायटोरिड सारख्या नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया

  • रेनेयू यंत्रणा (नाला ईकॉलॉजिकल रेस्टोरेशन यंत्रणा) जी वाहणार्‍या नाल्यांमध्येही वापरता येते?

  • ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम आणि जीआएस आधारित जलगुणवत्ता डेटाबेस तयार करणे

बीओडी म्हणजे काय?

बीओडी म्हणजे पाण्यातील जैविक प्रदूषक घटकांचे विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीवांना किती ऑक्सिजन लागतो, हे मोजणारा निर्देशांक. एखाद्या पाण्यात जर बीओडी जास्त असेल, तर त्यात जैविक प्रदूषण वाढलेले असते. ज्यामुळे त्या पाण्यातील जलचर आणि वनस्पतींसाठी लागणार्‍या ऑक्सिजनची पातळी कमी होते. जास्त बीओडी असलेले पाणी जैविकदृष्ट्या खूप प्रदूषित असते. त्यात सूक्ष्मजीव, विषारी घटक व घाण मोठ्या प्रमाणावर असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT