कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. रविवारीही शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली होती. जिल्ह्यासह धरणक्षेत्रातील पावसाचा जोरही ओसरला. यामुळे दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांची घट झाली असून, अद्याप 20 बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला व पाटगाव धरणक्षेत्रात झाला. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला सोमवार (दि. 23) पासून तीन दिवस ‘यलो’ अलर्ट दिला आहे.
शहरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधून-मधून काही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. दुपारी काहीकाळ उन्हाचा तडाखादेखील जाणवत होता. पावसाने उघडीप घेतल्याने आठवडी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. जिल्ह्यातही पावसाची उघडझाप सुरू आहे. गेल्या 24 ताासंत शहरात 5 मि.मी. तर जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सरासरी 5.2 मि. मी. पाऊस झाला. गगनबावडा वगळता अन्य तालुक्यांत तुरळक पावसाची नोंद झाली. पाटगाव धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. गेल्या 8 तासांत धरणक्षेत्रातील पावसाचा जोरदेखील ओसरला आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी रविवारी सकाळी सात वाजता 27 फूट 7 इंचांवर होती. रात्री 10 वाजेपर्यंत यामध्ये 2 फूट 1 इंचाची घट होऊन पातळी 25 फूट 5 इंचांवर पोहोचली होती. अद्याप शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, सांगशी, ठाणे आळवे, बरकी, यवलूज, हळदी, राशिवडे, शिरगाव, दत्तवाड, सुळकूड, सिद्धनेर्ली, खोची, मांगले-सावर्डे हे बंधारे पाण्याखाली आहेत.