कोल्हापूर : पंचगंगा घाट परिसरात नदीपात्रातील खुली झालेली मंदिरे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.  
कोल्हापूर

Panchganga Water Level | विसर्ग पुन्हा कमी; पंचगंगेची पातळी ५.४ फुटांपर्यंत खाली

पुन्हा टंचाईची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राधानगरी आणि तुळशी धरणांतून भोगावती आणि पर्यायाने पंचगंगेत सोडले जाणारे पाणी गुरुवारी कमी करण्यात आले. बुधवारी (दि. १७) १,२५० क्युसेक पाणी म्हणजेच प्रतिसेकंद ३५ हजार ४०० लिटर पाणी सोडण्यात आले होते. गुरुवारी ते ७०० क्युसेकपर्यंत कमी म्हणजेच प्रतिसेकंद १९ हजार ८०० लिटर सोडले जात होते. यामुळे पंचगंगेची पातळी गेल्या २४ तासांत पुन्हा सुमारे पाऊण फुटाने घटली. ६ फुटांवर असणारी पातळी गुरुवारी दुपारी ४ वाजता ५.४ फुटांपर्यंत खाली आली.

पंचगंगेची पाणी पातळी योग्य प्रमाणात राहिली नाही; परिणामी तीन दिवस कोल्हापूर शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. पाणी उपसा करण्यासाठी धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. मंगळवारपासून राधानगरी धरणातून १,२०० क्युसेक, तर तुळशी धरणातून २५० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. यामुळे बुधवारी दुपारनंतर आवश्यक पातळीपर्यंत पाणी पोहोचू लागल्याने महापालिकेने उपसा सुरू केल्या‍ने गुरुवारी शहरात सुरळीत पाणीपुरवठा झाला.

बुधवारपर्यंत वाढलेला धरणातील पाण्याचा विसर्ग गुरुवारी कमी केला. जलसंपदा विभागाकडील दुपारी चारच्या आकडेवारीनुसार राधानगरीचा विसर्ग बुधवारच्या तुलनेत निम्‍मा केला. सध्या ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी धरणातील विसर्गही कमी करून तो २५० ऐवजी १०० क्युसेक करण्यात आला. यामुळे सध्या या दोन्ही धरणांतून एकूण ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाणीपुरवठ्यावर तूर्त परिणामाची शक्यता कमी

विसर्ग कमी झाला असला, पंचगंगेची पातळी कमी होत असली, तरी शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची तूर्त शक्यता नाही. काही दिवसांपासून काळम्मावाडी थेट पाईपलाईन बंद होती, ती आता पूर्ववत सुरू झाली आहे. थेट पाईपलाईनमधून उपसा सुरू असेपर्यंत शहराला पाण्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही. मात्र, त्या उपशावर परिणाम झाला आणि पंचगंगेत होणाऱ्या विसर्गाचे प्रमाण असेच राहिले, तर शहरात पुन्हा टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे.

पातळी पाऊण फुटाने कमी

धरणांतील विसर्ग कमी झाल्याने पंचगंगेची पाणी पातळी गुरुवारी आणखी सुमारे पाऊण फुटाने कमी झाली. बुधवारी पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावर पातळी ६ फूट होती. गुरुवारी ती ५.४ फूट इतकी कमी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT