Panchganga river
पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली. Pudhari News Network
कोल्हापूर

पंचगंगेची पाणी पातळी 33.7 फुटांवर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला. अनेक भागात कडकडीत ऊन पडले. पावसाने विश्रांती घेतली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेचीही पाणी पातळी संथ गतीने वाढत असून सोमवारी रात्री 10 वाजता ती 33.8 फुटावर गेली. त्यानंतर ती कमी होऊ लागली. रात्री 11 वा. 33.7 झाली. जिल्ह्यात 55 बंधार्‍यांवर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. यासह दहा मार्गही पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

शहरासह जिल्ह्यात सोमवारी पावसाने उघडीप दिली. शहर परिसरात सकाळी काही काळ वातावरण ढगाळ होते. यानंतर अधूनमधून कडकडीत ऊन पडत होते. दिवसभरात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली. पाऊस थांबला असला तरी गेल्या दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेची पाणी पातळी सकाळी आठ वाजता 32.3 फुटांवर होती. दुपारी एक वाजता ती 33.1 फुटांवर गेली होती. रात्री 8 वाजता ती 33.7 फुटांवर गेली. दिवसभरात 12 तासात पंचगंगेच्या पातळीत सव्वा फुटाने वाढ झाली. रात्री दहा वाजता पाणी पातळी 33.8 फुटांवर पोहोचली.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत चालल्याने पाण्याखाली जाणार्‍या बंधार्‍यांची संख्या सोमवारी 55 इतकी झाली. यामुळे सुमारे दीडशेहून अधिक गावांचा थेट होणारा संपर्क तुटला असून पर्यायी मार्गाने त्यांचा संपर्क सुरू आहे. जिल्ह्यातील चार राज्य मार्ग व सहा प्रमुख जिल्हा मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पाच मार्गावरील एस. टी. वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 32.4 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा (100.6) आणि चंदगड (75.8 मि.मी.) या दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. शाहूवाडीत 49.3 मि.मी., भुदरगड तालुक्यात 49.2 मि.मी., राधानगरीत 46.3 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील 16 प्रमुख धरणांपैकी 10 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. पाटगाव धरण क्षेत्रात सर्वाधिक 325 मि.मी. इतका सर्वाधिक पाऊस झाला. घटप्रभा परिसरात 255 मि.मी. पाऊस झाला. राधानगरी धरण क्षेत्रात 115 मि.मी., कासारीत 116 मि.मी., कुंभीत 162 मि.मी., जांबरेत 163 मि.मी., सर्फनाला परिसरात 102 मि.मी. तर कोदे धरण परिसरात गेल्या 24 तासात 139 मि.मी. पावसाची नोंद झाली.

‘अलमट्टी’ची पाणी पातळी 515 मीटरवर

अलमट्टी धरणात 60 हजार 606 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत असून सोमवारी सकाळी धरणात 64.59 टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणाची पाणी पातळी 515.16 मीटर इतकी होती. अलमट्टी धरणातील पाणी पातळीत वाढ होत असली तरी धरणातून सध्या केवळ 430 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिप्परगी बॅरेजची पाणी पातळी 521.60 मीटर इतकी झाली आहे. धरणात 3.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या 46 हजार 795 क्युसेक पाणी येत असून धरणातून 49 हजार 101 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

SCROLL FOR NEXT