कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. धरण क्षेत्रातील पावसाचा जोरही काहीसा ओसरल्याने सहा दिवसांनी रविवारी पंचगंगा नदीचे पाणी पात्रात गेले. दिवसभरात पाणी पातळीत अडीच फुटांची घट झाली असून रात्री 9 वाजता पातळी 28 फूट 7 इंचांवर होती. अद्याप 33 बंधारे पाण्याखाली आहेत. हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवार (दि. 30) पासून गुरुवार (दि. 3 जुलै) पर्यंत यलो व ऑरेंज अलर्ट दिला आहे.
शहरात सकाळपासून अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांसह नागरिकांची शहरात गर्दी होती. जिल्ह्यातील काही तालुक्यांत जोरदार तर काही तालुक्यात मध्यम सरी कोसळल्या. गेल्या 24 तासांत शहरात 3 मि.मी. तर जिल्ह्यात 12 तालुक्यांत सरासरी 11.5 मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला.
पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरांची पडझड सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 6 मालमत्तांचे 1 लाख 55 हजारांचे नुकसान झाल्याचे आपत्ती विभागाच्या अहवालात सांगण्यात आले.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत धरण क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत पाटगाव व सर्फनाला या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. गेल्या 8 तासांत हा जोर आणखी कमी झाला होता. पंचगंगा नदीची पाणी पातळी घट झाल्याने मंगळवारी (24 जून) पात्राबाहेर आलेले पंचगंगेचे पाणी रविवारी पात्रात गेले. सकाळी 7 वाजता पंचगंगा 30 फुटांवर होती. यामध्ये सायंकाळपर्यंत अडीच फुटांची घट होऊन पातळी 28 फूट 6 इंचावर आली होती. दिवसभरात 3 बंधारे खुले झाले असून अद्याप 36 बंधारे पाण्याखाली आहेत.
पंचगंगा नदीचे पाणी रविवारी सकाळी पात्रात गेले. यानंतर महापालिकेने नदी घाट परिसराची सफाई न केल्याने सर्वत्र चिखल आणि दलदल झाली आहे. परिणामी येथील रस्ता निसरडा झाल्याने नागरिकांना येथून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.