कोल्हापूर : शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून, पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. मंगळवारी पात्राबाहेर आलेले पुराचे पाणी बुधवारी गंगावेस ते शिवाजी पुलाकडे जाणार्या रस्त्याजवळ आले आहे. शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव यंदा जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. गेल्या 24 तासांत राधानगरीसह 16 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. पचगंगा नदीची पाणी पातळी रात्री 10 वाजता 34 फूट 10 इंचांवर पोहोचली होती. जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली गेले असून, सुमारे 120 गावांचा थेट संपर्क तुटला आहे. 12 मार्गांवरील एस.टी. वाहतूक बंद झाली आहे.
जिल्ह्यात 39 घरांच्या भिंती व किरकोळ पडझड झाली असल्याने 9 लाख 35 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले. 5 राज्यमार्ग व 10 जिल्हा मार्ग बंद झाले असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असल्याचे जिल्हा आपत्ती विभागाच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
शहरात दिवसभर अधूनमधून कोसळणार्या हलक्या सरी वगळता पावसाने उसंत घेतली होती. जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत शहरात 21 मि.मी., तर जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सरासरी 38.9 मि.मी. पाऊस झाला. याशिवाय सहा तालुक्यांतील 11 गावांत अतिवृष्टी झाली. यामध्ये आजरा तालुक्यातील आजरा, गवसे, मलिग्रे, भुदरगड तालुक्यात गारगोटी, पिंपळगाव, कडगाव, करडवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी, गगनबावडा तालुक्यात साळवण, शाहूवाडी तालुक्यात करंजफेण, पन्हाळा तालुक्यात बाजार भोगाव या गावांचा समावेश आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, कडवी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कोदे या 16 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. जाबरे, आंबेओहोळ, कोदे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
धुवाँधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणांमधून होणारा विसर्ग आणि पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता राजाराम बंधार्यावरील पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 5 इंचांवर होती. रात्री 10 वाजेपर्यंत पातळीत 1 फूट 5 इंचांची वाढ होऊन पातळी 34 फूट 10 इंचांवर पोहोचली. सकाळी 63 बंधारे पाण्याखाली होते. यापैकी मांडुकली आणि सावर्डे हे बंधारे खुले झाले असून, अद्याप 61 बंधारे पाण्याखाली आहेत.
एरव्ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात भरणारा कळंबा तलाव यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच म्हणजेच जून महिन्यात ओव्हरफ्लो झाला आहे. बुधवारी सकाळपासूनच तलावाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गेल्यावर्षी 23 जुलै 2024 रोजी कळंबा ओव्हरफ्लो झाला होता.
जिल्ह्यातील 11 धरण क्षेत्रांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये राधानगरी 3,100 क्युसेक, तुळशी 300, वारणा 1,720, कासारी 1,600, कडवी 220, कुंभी 300, घटप्रभा 4,665, जांबरे 230, सर्फनाला 168, धामणी 1,237, कोदे 634.
जिल्ह्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. जूनच्या 25 दिवसांची सरासरी 302.4 मि.मी. इतकी आहे. पावसाने जूनची सरासरी ओलांडली असून, 25 दिवसांत 330 मि.मी. पाऊस झाला आहे.