कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. दिवसभरात पातळी अडीच फुटांनी वाढून सायंकाळी रात्री १२ वाजता ३२ फूट ३ इंचावर स्थिरावली. पुराचे पाणी नदीघाट परिसरात पसरत असून पंचगंगा विहारकडे जाणारा रस्ता बंद झाला. गेल्या २४ तासांत कोतोली, राधानगरी, गगनबावड्यासह १४ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण ८७ टक्के भरले असून धरणाच्या पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
हवामान विभागाने जिल्ह्याला २५ जुलैपर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे. शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची उघडझाप सुरू होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३० मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ५८.५ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. यानंतर ४७.५ मि.मी. पाऊस राधानगरी, चंदगड ३९.३, पन्हाळा ३८.१, आजरा ३७, करवीर २९, गडहिंग्लज २८.४, भुदरगड २७.६, कागल २४.२, हातकणंगले २३, शाहूवाडी २०, शिरोळ तालुक्यात १६.९ मि.मी. पाऊस झाला.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, धामणी, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. पावसामुळे जिल्ह्यातील ८ खासगी मालमत्तांचे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन राज्य व दोन जिल्हा मार्गांवर पाणी आल्याने बंद झाले आहेत.
जिल्ह्यातील २९ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीची पाणी पातळी बुधवारी रात्री १२ वाजता २९ फूट ९ इंचांवर होती. गुरुवारी यात अडीच फुटांनी वाढ होऊन रात्री १२ वाजता ३२ फूट ३ इंचावर स्थिरावली होती. रात्री १२ वाजता पाणी पातळीत एक इंचाची घट झाली. जिल्ह्यातील २९ बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.