कोल्हापूर : प्लास्टिकचा महाराक्षस पर्यावरण गिळंकृत करत असताना प्लास्टिकच्या कणांसोबत नद्या-नाल्यांमध्ये मिसळणार्या प्रतिजैविकांच्या कणांमुळे देशभरातील नद्यांचे प्रदूषण आक्राळ-विक्राळ रूप धारण करत आहे. प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे मानवी मलमुत्रांद्वारे, रुग्णालयांमधील सांडपाणी, रासायनिक व सौंदर्यप्रसाधन उत्पादनांमधून प्रतिजैविकांचे कण थेट नदीत मिसळत आहेत. देशातील नद्यांचे 80 टक्के क्षेत्र प्रतिजैविकांनी प्रदूषित झाले असून यामध्ये पंचगंगा नदीचाही समावेश असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे एकेकाळी जेथे साध्या सर्दी, ताप खोकल्यासाठी रुग्णांना एखादी गोळी पुरेशी असायची तेथे आता त्याचे प्रमाण वाढले आहे. आज साधा सर्दी, खोकला झाला तरी आपण वैद्यकीय सल्ल्याशिवाय थेट प्रतिजैविक औषधे घेऊन टाकतो. मात्र, या औषधांचे उरलेले अंश मलमूत्राद्वारे नद्या-नाल्यांमध्ये दररोज मिसळत आहेत.
विनाप्रक्रिया सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्याने नदी अँटिबायोटिक प्रदूषणासाठी ‘हाय रिस्क झोन’ बनू शकते अशी शक्यता जागतिक संशोधनाच्या आधारावर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दररोज 90 एमएलडी सांडपाणी नदीत मिसळते. गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांना त्वचारोग, पोटदुखी, डायरिया यांसारखे आजार वारंवार उद्भवताना दिसत आहेत. हे अँटिबायोटिक प्रतिकारक्षमतेचे संभाव्य दुष्परिणाम देखील असू शकतात.
सध्या विषाणूंमध्ये सुरू होत असलेल्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविके अर्थात अँटिबायोटिक्सचा वापर माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये आणि शेतीत देखील केला जात आहे. या प्रतिजैविक औषधांचे उरलेले अंश मलमुत्राद्वारे किंवा उद्योगधंद्यांमधून पाण्यात मिसळतात. बहुतांश अँटिबायोटिक्स सांडपाण्यावर प्रक्रिया करताना पूर्णपणे नष्ट होत नाहीत, त्यामुळे ते कण सरळ नद्यांमध्ये मिसळतात.
अत्यल्प प्रमाणात अँटिबायोटिक्स (सबसँथेटिक डोस) देखील बॅक्टेरियामध्ये प्रतिकारशक्ती (रेजिस्टन्स) निर्माण करतात. हे बॅक्टेरिया त्या प्रतिजैविक औषधांना प्रतिसाद देत नाहीत. यालाच अँटिबायोटिक रेजिस्टन्स म्हणतात. त्यामुळे सामान्य जंतुसंसर्ग बळावतो, उपचार निष्फळ होतात आणि मृत्यूदर होतो.
सिंगल यूज प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार होणारे नॅनो-प्लास्टिकचे कण इतके सूक्ष्म असतात की ते बॅक्टेरियांमध्ये प्रवेश करून त्यांचे वर्तन बदलू शकतात. हे ईकोलायसारख्या बॅक्टेरियामधून अँटिबायोटिक प्रतिकारशक्तीचे जीन्स घेऊन ते लॅक्टोबॅसिलस अॅसिडोफिलस या आपल्या पचनसंस्थेतील उपयुक्त बॅक्टेरियांमध्ये पोहोचवतात. त्यामुळे, आपल्या स्वतःच्या आतड्यातले चांगले बॅक्टेरिया अँटिबायोटिक रेसिस्टन्सचे वाहक बनतात.
सिंगल युज प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे मायक्रोप्लास्टिक कणांचे प्रमाण वाढले आहे. समुद्र, नद्या, नाले, तलावासह जलचर आणि अगदी मानवाच्या रक्तातही असे मायक्रोप्लास्टिकचे कण सापडत आहे. याच प्लास्टिकच्या बारीक कणांवर अँटिबायोटिक्सचे कण चिकटतात व ते जलप्रवाहात मिसळतात. यामुळे नद्यांमध्ये प्रतिजैविक प्रदूषण वाढत असून अँटिबायोटिक्स रेजिस्टन्स निर्माण होत आहे.डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरण तज्ज्ञ