प्रदूषणामुळे पंचगंगेचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक 
कोल्हापूर

Panchganga Pollution : प्रदूषणामुळे पंचगंगेचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक

जिल्ह्याला काविळीचा विळखा

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : प्रदूषणाच्या नानाविध कारणांमुळे विषाक्त झालेल्या पंचगंगेसह जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या चार महिन्यांत तब्बल 61 जणांना कावीळ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यात 45 जणांना ॲक्युट हिपॅटायटीस, तर 16 जणांना तीव काविळीची लागण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आशा वर्कर्सच्या मदतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आणि ओ.टी. टेस्टद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नद्यांमध्ये मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे नद्यांचे पाणी विषारी बनले असून, त्यातूनच कावीळ आणि हिपॅटायटीससारख्या साथरोगांचा वेगाने प्रसार होत आहे.

यामुळे होते कावीळ

नदीपात्रामधील पाण्यात सांडपाणी, मलमूत्र विसर्जन आणि जलवाहिन्यांच्या गळतीमुळे हिपॅटायटीस ए आणि ई यासारखे विषाणू मिसळत आहेत. हे विषाणू यकृतावर हल्ला करतात, ज्यामुळे यकृताला सूज येऊन रक्तातील पिवळे द्रव्य (बिलिरुबिन) वाढते आणि रुग्णाला कावीळ होते.

काविळीची लक्षणे

तीव थकवा जाणवणे, भूक मंदावणे, मळमळ होणे, उलट्या, रक्तातील ‌‘बिलिरुबिन‌’चे वाढलेले प्रमाण, त्वचा आणि नखे पिवळी पडणे, लघवीचा रंग गडद पिवळा, ताप येणे, पोटात उजव्या बाजूला दुखणे किंवा अंगाला खाज सुटणे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत काविळीची मोठी साथ नाही. साथरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली लागू केली आहे. नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी आरोग्याची सुरक्षा म्हणून पाणी नेहमी उकळून, गाळून आणि शुद्ध करूनच प्यावे.
- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

‌‘या‌’ ठिकाणी काविळीचे रुग्ण सर्वाधिक

तालुका कावीळ रुग्णसंख्या

कोल्हापूर शहर 30

राधानगरी 12

शिरोळ 09

करवीर 05

हातकणंगले 02

भुदरगड 01

पन्हाळा 01

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT