कोल्हापूर : पंचगंगा नदीचे पाणी शनिवारी चौथ्यांदा पात्राबाहेर पडले.  Pudhari File Photo
कोल्हापूर

Panchganga river | पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर, 15 धरण क्षेत्रांत मुसळधार

दिवसभरात 4 फुटांची वाढ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर/राधानगरी : धरण क्षेत्रांत सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात चौथ्यांदा पात्राबाहेर पडले. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 4.4 फुटांची वाढ झाली असून पातळी रात्री 9 वाजता 30 फूट 6 इंचांवर होती. 53 बंधारे पाण्याखाली असून यातील 40 बंधारे एका दिवसात पाण्याखाली गेले. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजातून 5 हजार 712, तर वीजगृहातून 1 हजार 500 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपत्रात होत आहे. यामुळे नदीकाठाच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. शहरात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. अधूनमधून जोरदार सरीही बरसत होत्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात तसेच आंबा, राधानगरी, साळवण, उत्तूर या गावांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सरासरी 30 मि.मी., तर शहरात 24 मि.मी. पाऊस झाला.

धरण क्षेत्रांत दिवसात 1,938 मि.मी. पाऊस

जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रांत पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत 17 धरण प्रकल्पांमध्ये 1,938 मि.मी. पाऊस झाला. यामध्ये राधानगरी, तुळशी, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, घटप्रभा, जंगमहट्टी, जांबरे, सर्फनाला, धामणी, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यातील 16 धरण प्रकल्पांतून 32,695 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

दुपारी दोन दरवाजे बंद; थोड्यावेळाच पुन्हा खुले

राधानगरी धरण शुक्रवारी पूर्ण क्षमतेने भरले; मात्र शुक्रवारी रात्री धरणाचे तीन दरवाजे खुले झाले. शनिवारी पहाटे 4.30 वा. धरणाचा चार नंबरचा दरवाजा खुला झाला. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने दोन स्वयंचालित दरवाजे बंद झाले; मात्र दुपारनंतर धुवाँधार पावसामुळे पुन्हा दोन दरवाजे उघडले. सध्या चार दरवाजांतून 5,712 तर वीजगृहातून 1500 क्युसेक असा एकूण 7,212 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.

एसटी बसच्या फेर्‍या विस्कळीत

पावसाने जिल्ह्यातील एसटी बसच्या चार फेर्‍यांवर परिणाम झाला. रंकाळा - पडसाळी, रंकाळा - वाशी, रंकाळा चौकेवाडी, रंकाळा - मुरंबाळ या मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. एक राज्य मार्ग व तीन जिल्हा मार्गांवर अद्याप पाणी असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. गेल्या 24 तासांत पाच घरांची व दोन गोठ्यांची पडझड झाल्याने 1 लाख 98 हजार रुपयांचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT