कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने पाणी पाहण्यासाठी आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी घाटावर नागरिकांची गर्दी झाली होती.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Panchganga River | पंचगंगा पात्राबाहेर; पाणीपातळी पोहोचली ३१ फूट ९ इंचांवर : ३९ बंधारे पाण्याखाली

गगनबावड्यासह २७ ठिकाणी अतिवृष्‍टी, धरण क्षेत्रात अतिमुसळधार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार कोसळधारांमुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीचे पाणी रविवारी पात्राबाहेर पडले. २६ फूट २ इंचावर असलेली पंचगंगा रविवारी मध्यरात्री ५ फूट ७ इंचांनी वाढून ३१ फूट ९ इंचावर पोहोचली. तब्बल ३९ बंधारे पाण्याखाली गेले असून यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगडसह जिल्ह्यातील २७ गावांमध्ये अतिवृष्टी झाली. राधानगरीसह १७ धरण क्षेत्रांत अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने सोमवारी (दि. ६) देखील जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

जिल्ह्यात सर्वत्र जोरदार

हातकणंगले तालुक्यात २०.९ मिमी. पाऊस झाला. यानंतर शिरोळ १६.८, पन्हाळा ५८.३, शाहूवाडी ४६.९, राधानगरी ८१, गगनबावडा १४३.१, करवीर ४०.१, कागल ६०.२, गडहिंग्लज ४३.४, भुदरगड ८५.९, आजरा ६७.५, चंदगड ६५.३ मि.मी. पाऊस झाला.

रंकाळा तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ

शहरात पावसाचा जोर कायम असून रविवारी दिवसभर जोरदार सरींची हजेरी लागली. कधी धुवाँधार, तर कधी रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस दिवसभर बरसत होता. पावसामुळे रंकाळा तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारची सुट्टी असल्याने रंकाळा चौपाटी तसेच पंचगंगा घाटांवर पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

गेल्या २४ तासांत शहरात ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला होता. सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर दिवसभर अधूनमधून जोरदार सरी आणि रिमझिम पाऊस अशी स्थिती कायम राहिली. शनिवारप्रमाणे रविवारी पावसाचा जोर कायम राहिला. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली.

पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय

सततच्या पावसामुळे गांधी मैदान, दुधाळी मैदानासह शहरातील अनेक छोटी-मोठी मैदाने पाण्याखाली गेली. तसेच राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि विविध पेठांतील कांही रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

पंचगंगा नदी घाटावर नागरिकांची मोठी गर्दी

यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी पाहण्यासाठी आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी पंचगंगा नदीवरील घाटांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली.

खेकडे-मासे खरेदीस गर्दी; शिवाजी पुलावर कोंडी

पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात खेकडे आणि मासे विक्रीसाठी आले आहेत. शिवाजी पुलाजवळ रविवारी सकाळपासून खेकडे व मासे खरेदीसाठी गर्दी झाल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत होती.

महाद्वार रोडवर रविवार असूनही शुकशुकाट

पावसामुळे रविवार असूनही महाद्वार रोडवरील नेहमीची गर्दी कमी होती. दुकानदार आणि फेरीवाल्यांनी आपला माल प्लास्टिकच्या कागदांनी झाकून सुरक्षित ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT