कुरुंदवाड : चार दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. राजापूर बंधाऱ्यावरून वाहत असलेले कृष्णा नदीचे पाणी.  (छाया : जमीर पठाण )
कोल्हापूर

Panchganga River | पंचगंगेची पातळी 41 फुटांवर; शिरोळ तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली

पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; कृष्णा १४ फुटांवर, राजापूर बंधाऱ्यावरून 28 हजार125 क्युसेक विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची तेरवाड बंधाऱ्यावरील पातळी शनिवारी ४१ फुटांवर पोहोचली. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील दोन बंधारे आणि कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेले आहेत. २८ हजार १२५ क्युसेक इतका विसर्ग कर्नाटक राज्यात सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन तुंबली आहे. पाणी पातळी आणखी वाढल्यानंतर ही जलपर्णी प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीची पातळी १४ फुटांवर पोहोचली असून, कराड येथे १४ फूट ८ इंच, राजाराम बंधाऱ्यावर ११ फूट १० इंच, आयर्विन पुलाजवळ ६ फूट, ताकारी येथे ११ फूट २ इंच, बहे येथे ४ फूट, तर मिलवडी येथे ९ फूट पाणी नोंदविण्यात आले आहे. नदीच्या सर्वच ठिकाणी पाणी पातळीत वाढ होत असल्याने पाटबंधारे विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

धरणांमधील पाणीसाठाही वाढत आहे. कोयना धरणात १८.१९ टीएमसी, वारणा धरणात १२.५० टीएमसी, तर अलमट्टी धरणात २०.६८९ टीएमसी साठा उपलब्ध आहे. वारणा धरणातून १०० क्युसेक, अलमट्टी धरणातून ८२२ क्युसेक विसर्ग सुरू असून, कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

शिरोळ तालुक्यात चार नद्यांच्या पातळीत वाढ

जयसिंगपूर : संततधार पावसाने शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा आणि वारणा या चारही नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, शनिवारी परिस्थिती अधिकच गंभीर बनली. पाणी पातळीत झालेल्या तीव्र वाढीमुळे शुक्रवारी दुपारी शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला होता. यामुळे शिरोळ ते कुरुंदवाड जुना मार्ग बंद झाला. नदीच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहून आली आहे. ही जलपर्णी पंचगंगा नदीच्या बंधाऱ्याला येऊन अडकली असून, त्याचे मोठे थर साचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT