कोल्हापूर : पौर्णिमेच्या शांत शीतल चंद्रप्रकाशाने व्यापलेले आभाळ, पावसाची सर यऊन गेल्यानंतरचा हवेतील मंद गारवा, वार्याच्या झुळकेसोबत झाडांच्या पानांची मंजुळ सळसळ अशा शुक्रवारच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या रम्य उत्तररात्री लाखो पणत्यांनी पंचगंगेचा घाट उजळला. पौर्णिमेची उत्तररात्र जशी उमलत जाईल तशा पंचगंगेच्या घाटावरील हजारो पणत्यांच्या ज्योती तेजाळल्या. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता कोल्हापूरकरांनी पंचगंगेच्या घाटाची प्रत्येक पायरी पणत्यांच्या ओळींनी सजवली. दीपोत्सवाचा हा तेजोमय सोहळा शेकडो कोल्हापूरकरांनी याचि देही याचि डोळा अनुभवला.
त्रिपुरारी पौर्णिमेने दिवाळीची सांगता केली जाते. कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो. पंचगंगा विहार मंडळाच्या पुढाकाराने तसेच कोल्हापुरातील हौशी कलाकार व नागरिकांच्या उत्साहाने दरवर्षी कार्तिक पौर्णिमेची पहाट पंचगंगेचे एक वेगळेच लख्ख रूप अनुभवणारी ठरते. यंदाही शुक्रवारच्या पहाटे दीपोत्सवाने नदीघाटाचे सौंदर्य उजळून टाकले. रात्री दहापासूनच रांगोळी कलाकारांनी नदीतीरावर रांगोळ्यांची सजावट करण्यास सुरुवात केली. कलात्मक रांगोळ्यांचा गालिचा पसरला होता. हौशी गायकांच्या सुरांच्या वर्षावात रसिक तल्लीन झाले होते.
दीपोत्सवात सामाजिक संदेश देणारे फलक नदीतीरावर लावण्यात आले होते. तसेच स्त्रियांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी दीपोत्सवात ‘आदर स्त्री शक्तीचा’ अशी अक्षरे पणत्यांच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहात प्रज्वलित करण्यात आली. या आगळ्या-वेगळ्या प्रयोगाने उपस्थितांचे लक्ष वेधले.