कोल्हापूर : पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीसह टोळीच्या कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील ‘कनेक्शन’ची महाराष्ट्र दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय गँगस्टर्सशी संपर्क साधल्याच्या संशयातून पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांना ताब्यात घेतले. आठ ते दहा तास अज्ञातस्थळी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आल्याचे समजते. वरिष्ठ सूत्राकडूनही वृत्तास शुक्रवारी दुजोरा मिळाला.
भट्टीच्या दहशतवादी टोळीत शहजाद भट्टी, त्याचे साथीदार अमजल गुज्जर, अबिट जाट, राणा हुसेन, अब्दुल मेनन, मुन्ना झिंगाडा, फारूख खोकर, जाफर सुपारी, सनी टायगर, शेख सलमान, सर्फराज डोंगर ऊर्फ जोरासिंग, अबू मुसा, हे त्याचे हस्तक असून, हे सर्व जण समाजमाध्यमांतून भारतातील तरुणांशी संपर्क ठेवून असल्याचे एटीएसला समजले. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून गँगस्टर्सशी संपर्क ठेवणारे, त्यांच्या पोस्टना प्रतिसाद देणारे किंवा समर्थन करणारे अनेकजण आता ‘एटीएस’च्या ‘रडार’वर आले आहेत. भट्टीच्या संपर्कात राहिल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांची चौकशी सुरू झाली आहे.
कोल्हापुरातील ‘त्या’ दोन तरुणांची पुन्हा चौकशी शक्य
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संपर्क केल्याचा संशय आहे. गुरुवारी सकाळी ‘एटीएस’चे पथक कोल्हापुरात दाखल झाले. दोन तरुणांची अज्ञातस्थळी दिवसभर चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. मात्र, चौकशीत काही ठोस माहिती मिळाली नसल्याने त्यांची सुटका करण्यात आली. संबंधित तरुणांची पुन्हा कोणत्याही क्षणी फेरचौकशी होऊ शकते. त्यामुळे दोन्हीही तरुणांना शहराबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही समजते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत दुजोरा दिला.
पुणे, मुंबई, नालासोपारा, मीरा रोड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, जळगाव, धुळ्यासह कोल्हापूर, सांगलीत एटीएस पथकांकडून एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आली. संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. प्रत्येक संशयिताच्या सोशल मीडिया प्रोफाइलची पडताळणी करण्यात आली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले.