कोल्हापूर ः हल्ल्याच्या अर्धा तास आधी आम्ही तिथून खाली उतरलो. वर जात असलेल्या पर्यटकांवरच हा भीषण अतिरेकी हल्ला झाल्याचे आम्हाला श्रीनगरला आल्यावर कळले. आम्ही किती मोठ्या संकटातून वाचलो, अशी आपबिती हुपरीतील नितीन घट्टे यांनी सांगितली.
घट्टे यांच्यासोबत 4 कुटुंबांतील 16 जण आहेत, ज्यात महिला आणि लहान मुले यांचाही समावेश आहे. ही मंडळी सध्या श्रीनगरमधील हॉटेल कश्मीर महल रिसॉर्ट या ठिकाणी अडकून पडले आहेत. अतिरेकी हल्ल्यानंतर वातावरणात भीतीचे आणि असुरक्षिततेचे सावट आहे. घट्टे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, हल्ल्यानंतर आम्ही सहल तत्काळ थांबवली आणि परतीसाठी प्रयत्न सुरू केले. श्रीनगरहून एकाच वेळी अनेक पर्यटक परत येऊ लागल्याने विमानासाठी जबरदस्त गर्दी झाली. आम्हाला फ्लाईट मिळत नाही. घट्टे यांनी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मध्यस्थीमुळे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची हॉटेलवर जाऊन भेट घेतली व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिल्याचे घट्टे म्हणाले.