कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे ‘भारत - पाकिस्तान युद्ध आणि सद्य:स्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. मंगळवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हे व्याख्यान होणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. गेल्या 38 वर्षांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत यावर्षी डॉ. देवळाणकर 35 वे पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरू झालेल्या भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. देवळाणकर आपल्या खास शैलीत ‘भारत - पाकिस्तान युद्ध आणि सद्य:स्थिती’ या विषयावर मांडणी करणार आहेत. गेली तीन दशके शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. देवळाणकर यांचे नाव विचारवंत, अभ्यासू आणि धोरणात्मक निर्णयक्षमता असलेल्या अधिकार्यांमध्ये घेतले जाते.
उच्च शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे, धोरण निर्मितीत मोलाची भूमिका बजावणारे, आंतरराष्ट्रीय राजकारणावर सखोल अभ्यास असणारे, जेएनयू (नवी दिल्ली) येथून एम.फिल., पीएच.डी. पदवीप्राप्त डॉ. देवळाणकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव, राज्य प्रशासकीय सेवा संस्थेचे संचालक, गव्हर्न्मेंट लॉ कॉलेज मुंबईचे प्राचार्य, मनुष्यबळ विकास विभागातील विशेष कर्तव्य अधिकारी, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, डॉ. होमी भाभा विद्यापीठात संशोधन व नवोन्मेष विभागाचे संचालक अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.