कोल्हापूर

P N Patil Bhogavati Election : पी. एन. यांची बेरीज यशस्वी; विरोधकांना बेकी भोवली!

मोहन कारंडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेवर पुन्हा एकदा आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी शिक्कामोर्तब केले आहे. कारखान्याची सत्ता पुन्हा आपल्या हाती राखताना त्यांनी केलेली बेरीज त्यांना राजकीयद़ृष्ट्याही फायदेशीर ठरणार आहे. 34 वर्षांचे सडोलीकर पाटलांच्यातील राजकीय संघर्ष थांबवून पी. एन. पाटील यांनी टाकलेले पाऊल आणि एकूणच केलेली राजकीय बेरीज त्यांना फायद्याची ठरली आहे. विरोधकांकडे ताकद होती. मात्र त्यांच्यातच फूट पडली आणि तिथेच सत्ताधार्‍यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

भोगावती कारखान्याच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. सत्ताधार्‍यांवर नेहमीच आरोप होतात. इथे आरोपाची धार थोडी वेगळी होती. सभासदांना साखर न मिळणे, कारखान्यावरील कर्जाचा बोजा आणि साखर चोरीचे आरोप यामुळे कारखान्याची निवडणूक कमालीची गाजली. विरोधकांच्या भात्यात हे चांगले बाण होते. मात्र, या बाणांनी राजकीय विरोधतकांना गारद करण्याऐवजी त्यांनी आपसातच लढून कारखान्याची सत्ता घालविली. विरोधकांची एकी झाली असती तर काही जागा जरुर त्यांना मिळाल्या असत्या; मात्र कमालीचा दुराग्रह आणि मोठ्या अपेक्षा यामुळे त्यांना संधी असूनही त्याचा उपयोग करता आला नाही.

राजकीय विरोधकांना सोबत घेतले

पी. एन. पाटील यांनी स्वतः पॅनेलच्या बाहेर राहून सूत्रे हलविली. राजकीय विरोधक असलेले माजी आमदार संपतराव पवार-पाटील आणि अशोकराव पवार-पाटील यांना बरोबर घेऊन अशोकरावांच्या मुलाला पॅनेलमध्ये संधी दिली. क्रांतिसिंह पाटील यांना प्रचारात गुंतवले आणि विरोधकांच्या प्रत्येक हालचालीवर चाणाक्षपणे लक्ष ठेवून अलगदपणे सत्ता घेतली.

विधानसभेची गणिते आकाराला

आमदारकीचे राजकारण या कारखान्याभोवती गुंतले आहे. करवीर आणि राधानगरी मतदारसंघावर प्रभाव टाकणारा हा कारखाना असल्याने नेत्यांचे कसब पणाला लागले होते. माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या मागे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपली ताकद उभी केली होती तर राधानगरीत मेहुणे माजी आमदार के. पी. पाटील यांचे वर्चस्व झुगारून देऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपली ताकद पी. एन. पाटील यांच्यासोबत उभी केली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे पी. एन. पाटील यांच्या समवेत होते. येथूनच आता विधानसभेची गणिते आकाराला येणार आहेत.

विजयात राजकीय आडाखे

पी. एन. पाटील पुन्हा करवीरमधून विधानसभेची निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. भोगावतीच्या सत्तेने त्यांना बळ दिले आहे तर ए. वाय. पाटील हे राधानगरी-भुदरगडमधून इच्छुक असून भोगावतीतील विजयाचा आपल्याला कसा फायदा होईल यावर त्यांचे लक्ष असेल. मात्र ते कोणामार्फत लढणार हे अद्याप निश्चित नाही. सध्या ते महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र या संघाचे प्रतिनिधित्व शिवसेना शिंदे गटाचे आ. प्रकाश आबिटकर करीत आहेत. त्यामुळे हा गुंता वरिष्ठ पातळीवरच सुटणार आहे. धैर्यशिल पाटील-कौलवकर यांनी चुलते उदयसिंह पाटील कौलवकर यांना पराभूत करून कारखान्यात पुन्हा प्रवेश केला आहे. विरोधकांची एकजूट असती तर त्यांच्या जोडीला आणखी शिलेदार आले असते. मात्र ते घडले नाही.

नेतृत्वाला झळाळी

पी. एन. पाटील पॅनेलबाहेर राहिले आणि उदयसिंह पाटील पराभूत झाले. यामुळे अध्यक्षपद कोणाकडेही सोपविले तरी सत्तारूढ पॅनेलचे नेतृत्व करणार्‍यांना कारखान्यातील कारभारावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे. सर्व कारभार आणि कारखान्यासमोरील आव्हाने याचा सामना करताना काटेरी वाट तुडवावी लागणार आहे हे निश्चित. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोगावतीच्या विजयाने पी. एन. पाटील यांचे नेतृत्व उजळून निघाले आहे.

'भोगावती'ची यंग ब्रिगेड

सत्तारूढ गटाने तरुणांना संधी दिली. त्यामुळे नवे चेहरे राजकारणात आले. हेच चेहरे राजकीय मोट बांधताना उपयोगाला येणार आहेत. धीरज डोंगळे, शिवाजी कारंडे यांच्या जोडीला आता अनिरुद्ध पाटील, अभिजित पाटील, अक्षय पवार-पाटील असे तरुण कारखान्याच्या सत्तेत आले आहेत, तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर, क्रांतीसिंह पवार-पाटील हे पॅनेल बाहेर राहून नेतृत्व करणारे तरुण चेहरे चर्चेत राहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT