Skin Cancer Prevention | ‘ओझोन’ संवर्धनाने दरवर्षी २० लाख जणांचा कॅन्सरचा धोका टळणार 
कोल्हापूर

Skin Cancer Prevention | ‘ओझोन’ संवर्धनाने दरवर्षी २० लाख जणांचा कॅन्सरचा धोका टळणार

मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या यशामुळे त्वचेच्या कर्करोगाची वाढ थांबतेय; भारताची दमदार कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनच्या थराची झीज रोखण्यासाठी जगाने केलेल्या प्रयत्नांचे आता परिणामही समोर येत आहेत. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे अतिनील किरणोत्सर्गामुळे होऊ शकणाऱ्या त्वचेच्या कर्करोगाच्या प्रकरणांनाही आळा बसला आहे. ओझोन संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे २०३० पर्यंत दरवर्षी तब्बल २० लाखांपर्यंत त्वचेच्या कर्करोगाची प्रकरणे टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. या जागतिक प्रयत्नांत भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे. भारताने रेफ्रिजरंट वायूची गळती रोखणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढविण्यासाठी १८ मिनी रिक्लेमेशन केंद्रे उभारली असून, त्यापैकी एक महाराष्ट्रात आहे.

मॉन्ट्रियल प्रोटोकॉलअंतर्गत भारताने ओझोन विघातक पदार्थांच्या उच्चाटनासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करून सीएफसी, सीटीसी, हॅलॉन आणि एचसीएफसी यांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी केला. २०१९ मध्ये इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन आणला आहे. २०३७ - ३८ पर्यंत कूलिंगची मागणी २० ते २५ टक्के, रेफ्रिजरंटची मागणी २५ ते ३० टक्के आणि कूलिंगसाठी लागणारी ऊर्जेची गरज २५ ते ४० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे.

अतिनील किरणांमुळे त्वचेच्या पेशींत डीएनएचे नुकसान होते

ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील (यूव्ही बी) किरणांचा मोठा भाग शोषून घेतो. ओझोनची झीज झाली असती, तर अधिक ‘यूव्ही बी’ किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचले असते आणि त्वचेच्या पेशींमध्ये डीएनएचे नुकसान होऊन त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढला असता. सीएफसी, हॅलॉनसारख्या ओझोन विघातक रसायनांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलद्वारे नियंत्रण आणल्याने २०३० पर्यंत दरवर्षी २० लाखांपर्यंत त्वचेच्या कर्करोगाची प्रकरणे टाळता येऊ शकतात.

१८ राज्यांत मिनी रिक्लेमेशन केंद्रे

ओझोन संरक्षणाची लढाई केवळ रसायनांवर बंदी घालण्यापुरती राहिलेली नाही. एसी, फ्रिज आणि रेफ्रिजरेशन उपकरणांची संख्या वाढत असताना त्यातील रेफ्रिजरंटची गळती रोखणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढविणेही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी भारताने १८ मिनी रिक्लेमेशन केंद्रे उभारली असून, त्यापैकी एक महाराष्ट्रात आहे. या केंद्रांमध्ये सीएफसी, एचसीएफसी आणि एचएफसी सह विविध रेफ्रिजरंट पुन्हा मिळविण्याची सुविधा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT